गेल्या दोन दशकात इतर पक्षांनी कसा केला राज ठाकरेंचा राजकीय वापर
मनसेच्या स्थापनेनंतर पहिली काही वर्ष पक्षाने राज्यात आपली ताकद दाखवून दिली. मात्र जसजशी वर्ष सरत गेली तसं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राजकीय ताकद कमीकमी होत गेली. यादरम्यान राज ठाकरेंचा सर्वच पक्षांनी वेळोवेळी फायदा घेतला.
मुंबई : राज ठाकरे यांचा गेल्या दशकभरात राज्यातील प्रत्येक पक्षाने फायदा घेतला आहे. राजकीय ताकद वाढवण्यासाठी राज ठाकरे यांनी इतर पक्षांना मदत केली, मात्र ते स्वत:चा पक्षाचा मोठा करु शकले नाहीत. मनसेच्या स्थापनेनंतर पहिली काही वर्ष पक्षाने राज्यात आपली ताकद दाखवून दिली. मात्र जसजशी वर्ष सरत गेली तसं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राजकीय ताकद कमीकमी होत गेली. मुंबईत काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनने बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात महामोर्चा काढला. भाजपला समर्थन देण्यासाठीची ही तयारी असल्याचं राजकीय विश्लेषकांच म्हणणं आहे.
2006 साली शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यानंतर राज ठाकरेंनी सर्वात आधी मुंबईत मराठीचा मुद्दा उपस्थित करत परप्रातियांना विरोध सुरु केला. मात्र मराठीचा मुद्दा सर्वात आधी शिवसेनेनं हाती घेतला होता. त्यानंतर 1987 मध्ये शिवसेनेनं हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आणि मराठीचा मुद्दा मागे पडला होता. मात्र राज ठाकरे यांनी मराठी मुद्दा पुन्हा पुढे आणला आणि आपली भूमिका मांडली. त्यावेळी राज ठाकरेंच्या रुपाने विरोधी पक्षाला कमकुवत करण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेच्या रुपाने एक मोठा पक्ष मिळाला. काँग्रेसने 50 वर्ष जुनी रणनिती पुन्हा अवलंबली. 60 च्या दशकात विरोधी पक्षाला कमकुवत करण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेला अप्रत्यक्ष समर्थन देण्यास सुरुवात केली होती. ही गोष्ट लपून राहिली नाही. त्यावेळी काँग्रेसचे वसंतदादा पाटील राज्याचे मुख्यमंत्री होते म्हणून लोक शिवसेनेला 'वसंत सेना' म्हणत खिल्ली उडवत होते.त्यानंतर वसंतदादांप्रमाणे 2008 साली तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मनसेबद्दल नरमाईची भूमिका घेतली. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे अशा शहरांमध्ये राज ठाकरे यांनी भडकाऊ भाषणं केली. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांविरोधात जोरदार हिंसा केली आणि त्यांना महाराष्ट्रातून हाकलण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या अंदाजानुसार, मनसेने मराठीचा मुद्दा लावून धरला तर शिवसेनेची ताकद कमी होईल आणि शिवसेनेच्या मतांचं विभाजन होईल. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची रणनिती कामी आली आणि याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला झाला. शिवसेना-भाजपच्या मतांचं विभाजन झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची पुन्हा राज्यात सत्ता आली. मनसेचे 2009 मध्ये 13 आमदार निवडून आले होते. अनेक ठिकाणी मनसेच्या उमेदवारांमुळे शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. त्यानंतर नाशिक महानगरपालिकेवरही मनसेनं कब्जा केला. त्यावेळी मनसेमुळे शिवसेनेचं वजन थोडं कमी झालं होतं.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे भाजपच्या बाजूने थोडे झुकले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार ज्याठिकाणी असतील तेथे आम्ही उमेदवार देणार नाही, अशी घोषणाच राज ठाकरेंनी केली होती. मात्र शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात निवडणूक लढवण्यावर राज ठाकरे ठाम होते. भाजपसोबतची जवळीत पाहून त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसे भाजपसोबत युती करेल, असे अंदाज बांधले जात होते. मात्र तसं झालं नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची मनसे 14 आमदारांवरुन एका आमदारावर आली. 2017 मध्ये नाशिक महापालिकेवरील सत्ताही राज ठाकरेंनी गमावली.
2019 लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेनं एकही जागा लढवली नाही. मात्र राज ठाकरेंनी भाजप विरोधात अनेक प्रचारसभा घेतल्या. त्यावेळीही काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत व्हावी यासाठी राज ठाकरे लोकसभेत प्रचार करत होते, असं बोललं जात होतं. या सभांना मोठ्या प्रमाणावर काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. मात्र राज ठाकरेंच्या या सभांचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला काही झाला नाही आणि आघाडीला 48 पैकी केवळ सहा जागी विजय मिळवता आला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीतही मनसेचा एकच आमदार निवडून आला. आता मनसे त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष करत असल्याची चर्चा आहे. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर मनसेसाठी पुन्हा एकदा आशेचं किरण निर्माण झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या विरोधी विचारधारेच्या पक्षांसोबत आघाडी केली आणि त्यांचा हिंदुत्वाचा मुद्दा कमी पडत गेला. राज ठाकरे यांनी याच संधीचा फायदा घेतला आणि हिंदुत्त्वचा मुद्दा हाती घेतला. शिवसेनेसोबत युती तुटल्यानंतर भाजपही एका मित्रपक्षाच्या शोधात होती. त्यात राज ठाकरेंकडून भाजपसोबत जाण्याचे संकेत मिळत आहेत. रविवारी निघालेला मोर्चा त्या दिशेने पहिलं पाऊल मानलं जात आहे.
राज ठाकरे यांनी भाषण शैली आणि त्यांची गर्दी जमवण्याची क्षमता नेहमीत चर्चेचा विषय असतो. राज ठाकरेंच्या याच कौशल्यामुळे इतर पक्षांना याचा फायदा घेण्याची संधी मिळते. मात्र मनसेला याचा काहीही फायदा होत नाही ही वेगळी गोष्ट आहे. राज ठाकरे गर्दी जमवतात मात्र त्याचं मतात रुपांतर होत नाही, अशी राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा असते. मात्र येणाऱ्या काळात मनसे आणि भाजप एकत्र दिसणार का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. महत्वाचं म्हणजे याचा मनसेला फायदा होणार का? हे पण तितकच महत्त्वाचं असणार आहे.