Raj Thackeray : बहुचर्चित सभेसाठी राज ठाकरे आज पुण्याहून औरंगाबादला जाणार; जाता-जाता अनेक कार्यक्रम, जाणून घ्या दौरा
Raj Thackray Aurangabad Rally Sabha Live : राज ठाकरेंच्या उद्या औरंगाबादेत होणाऱ्या बहुचर्चित सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा आज पुणे ते औरंगाबाद दौराही चर्चेत आहे.
Raj Thackray Aurangabad Rally Sabha Live : मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून काढलं आहे. त्यातच राज ठाकरेंच्या उद्या औरंगाबादेत होणाऱ्या बहुचर्चित सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा आज पुणे ते औरंगाबाद दौराही चर्चेत आहे. सकाळपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांनी या दौऱ्याची आखणी करण्यात आलीय. आणि औरंगाबादच्या सभेआधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न मनसेनं केला आहे. पुणे ते औरंगाबाद प्रवासात राज ठाकरेंचं ठिकठिकाणी जंगी स्वागतही केलं जाणार आहे.
राज ठाकरे यांच्या सभेचं काऊंटडाऊन सुरु
राज ठाकरे यांच्या सभेचं काऊंटडाऊन सुरु झालंय. महाराष्ट्र दिनी होणाऱ्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. औरंगाबादच्या महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सभा गाजवल्या होत्या. याच मैदानावरुन बाळासाहेबांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली होती. आता त्याच मैदानावर राज ठाकरे यांची उद्या सभा होतेय. राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाण्यातील सभेत मशिदीवरील भोंग्यांना विरोध दर्शवलाय. तसंच ते भोंगे उतरवण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. त्यामुळे आता राज ठाकरे उद्या कोणती गर्जना करणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. ठाकरी तोफ कुणावर धडाडणार याची उत्सुकता लागलीय.
राज ठाकरे यांच्या पुण्यातील घराबाहेर धार्मिक विधी
औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे आज पुण्याहून रवाना होणार आहेत. राज ठाकरे यांच्या पुण्यातील घराबाहेर धार्मिक विधी पार पडणार आहेत. राजमहाल इथं १०० ते २०० पुरोहितांच्या उपस्थितीत हे विधी पार पडतील. शेकडो गुरुजी राज ठाकरे यांना शुभ आशीर्वाद देतील. त्यानंतर राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादकडे रवाना होतील. राज ठाकरे यांच्यासोबत मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि काही नेते औरंगाबादच्या दिशेने निघणार आहेत.
राज ठाकरे यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा असणार आहे. पुणे ते औरंगाबाद दरम्यान राज ठाकरे यांच्या जागोजागी स्वागताची तयारी मनसैनिकांनी केलीय. राज ठाकरे यांची उद्या औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. महाराष्ट्र दिनी होणाऱ्या या सभेचं काऊंटडाऊन सुरु झालंय. औरंगाबादमध्ये होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर आणखी एक टीझर मनसेनं प्रसिद्ध केलाय.
छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू इथल्या समाधी ठिकाणी जाऊन दर्शन घेणार
राज ठाकरे पुण्यातून निघाल्यानंतर जवळच असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू इथल्या समाधी ठिकाणी जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते पुढे औरंगाबादकडे रवाना होतील. औरंगाबादच्या सभेआधी संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाण्याचा निर्णय घेऊन राज यांनी वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्याची मागणी अनेक वर्षापासून होतेय. त्यावरून राजकारणही रंगलंय. या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधल्या सभेत राज ठाकरे हा मुद्दा उपस्थित करणार का याचीही उत्सुकता आहे. राज यांच्या वढू दौऱ्याकडे त्यादृष्टीनं पाहिलं जातंय.
राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधल्या सभेमुळे मनसे विरुद्ध शिवसेना संघर्षाची झलकही पाहायला मिळतेय. हिंदुत्वावरून दोन्ही पक्षांत स्पर्धा सुरु झालीय. त्यामुळे मनसेच्या बॅनरच्या बाजूला शिवसेनेनं बॅनर लावून शिवसेनेला उत्तर दिलंय. खरे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब अशा आशयाचे बॅनर शिवसेनेनं लावले आहेत. औरंगाबादमधल्या 10 चौकांत मनसेच्या बॅनरच्या बाजूला शिवसेनेनं बॅनर लावून उत्तर दिलंय. विशेष म्हणजे राज ठाकरे ज्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा घेणार आहेत. त्याच मैदानात लवकरच सभा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्युत्तर देणार आहेत.