Rain Update : राज्यभर मुसळधार पाऊस, परभणीत शेतीचे मोठे नुकसान, बीडमध्ये दुकानात पाणी
Maharashtra Rain Update : राज्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आज बीड, परभणी, नांदेडसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय.
मुंबई : परतीच्या पावसाने राज्यभर धुमाकूळ घातला आहे. परतीच्या या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज परभणी जिल्ह्यातील सोनपेठ आणि जिंतूर तालुक्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झालाय. त्यामुळे तेथे देखील पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. तर बीडमधील जालना रोडवरील दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे. नांदेड जिल्ह्यात पीक काढणीच्या दिवसातच पावसाचा जोर वाढल्याने शेती कामांचा खोळंबा झालाय. नांदेड जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून परतीच्या पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.
बीडमध्ये दुकानात शिरलं पाणी
बीडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जालना रोडवर असलेल्या अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसानं थैमान घातलं असून याचा फटका शहरातील दुकानदारांना देखील बसत आहे. आज बीड शहरात सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसाचे पाणी जालना रोडवर असलेल्या अनेक दुकानांमध्ये शिरलं होतं. तर जालना रोड देखील पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने या रोडला तळ्याचे स्वरूप आलं होतं.
बीड शहरात अनेक नाल्या छोट्या असल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे अनेक दुकानदारांचं या पाण्यामुळे नुकसान होतं. बीडमधील सोयाबीन आणि कपाशीचे मोठे नुकसान झालंय. यासोबतच उसाचे देखील या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
सांगोल्यात पिकं कुजली
दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात देखील परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलाय. सांगोला तालुक्यातील महुद परिसरात अतिवृष्टीमुळे सुर्यफुलाचे मोठे नुकसान झाले असून फुले कुजून गेल्याने त्यात अळ्या झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याच्या हाती आलेले पीक वाया गेलं आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे.
नांदेडमध्ये दिवसभर मुसळधार पाऊस
नांदेड जिल्ह्यात पिकं काढणीच्या दिवसातच पावसाचा जोर वाढल्याने शेती कामांचा खोळंबा झालाय. नांदेड जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून परतीच्या पावसाची रिपरिप सुरू आहे. दरम्यान आज सकाळपासून पावसाचा जोर वाढून मुसळधार पाऊस बरसतोय. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीकामे खोलंबली आहेत. सततच्या पावसामुळे काढणीस आलेली सोयाबीन, उडीद , मुग, कापूस ही पीके मतिमोल झाली आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत सुरू असलेल्या या सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या दिवाळ सणवार मात्र विरजण पडलंय.
परभणी जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस
परभणी जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस झालाय. पावसाच्या पाण्याने ओढ्याला पूर आसा असून पुराच्या पाण्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यात परतीचा पाऊस थांबायचं नाव घेत नाही. आजही पहाटे जिल्ह्यातील सोनपेठ आणि जिंतूर तालुक्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झालाय. या पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे. सोनपेठच्या नरवाडी आणि इतर परिसरामध्ये पाऊस झालाय. तर दुसरीकडे जिंतुरच्या आसेगाव आणि दुधगाव या दोन्ही गावांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे कोली ओढ्याला पूर आला आहे. पुराचे पाणी शेतकरी गजानन पवार यांच्या शेतात शिरल्याने पवार यांच्या शेताला तळ्याचे स्वरूप आले होते. काढणीला आलेलं सोयाबीन पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने त्यांचे आणि इतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
उस्मानाबादमध्ये शेतीचे नुकसान
उस्मानाबाद जिल्ह्यात देखील आज मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील नद्या-नाले भरून वाहत आहेत. या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.