Rahul Gandhi : राहुल गांधींच्या विरोधात ठाणे नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल, अटक करण्याची मागणी
सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात ठाणे नगर पोलीस स्थानकात (Thane Nagar Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Rahul Gandhi : सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात ठाणे नगर पोलीस स्थानकात (Thane Nagar Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख वंदना सुहास डोंगरे (Vandana Suhas Dongre) यांनी ठाणे नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) सावरकर यांची बदनामी करणारे वक्तव्य केलं आहे. त्यामुळं स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचं डोंगरे यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधींना अटक करण्याची मागणी
महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमच्या महापुरुषांची बदनामी सहन करणार नाही असा पवित्रा वंदना डोंगरे यांनी घेतला आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने देखील यासाठी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने ठाण्यात निषेध मोर्चाही काढला होता. पोलिसांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनी मोर्चा दरम्यान केली होती. त्यानंतर संध्याकाळी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत पोलिस नक्की काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागले आहे.
नेमकं काय म्हणाले होते राहुल गांधी?
कर्नाटकच्या तुमकूर या ठिकाणी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकर यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले की, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंग्रजांना मदत करत होता, तर सावरकरांना इंग्रजांकडून भत्ता मिळत होता. हे ऐतिहासिक तथ्य आहे की, स्वातंत्र्याच्या लढाईत हे कुठेही दिसले नाहीत. हे सत्य भाजपच्या नेत्यांनी मान्य करावं. काँग्रेस पक्षातील नेत्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत इंग्रजांविरोधात लढा दिला. अनेक वर्ष त्यांना तुरुंगात राहावं लागलं. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल यांच्यासह अनेक नेत्यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला. द्वेष पसरणारे व्यक्ती कोण आहेत आणि ते कोणत्या समाजातून आले, याचा काहीही फरक पडत नाही. द्वेष आणि हिंसा पसरवणे हे देशाविरोधी कार्य आहे. आम्ही त्या प्रत्येक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात लढणार आहोत." असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: