(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Balasaheb chandere : पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे करणार शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
Pune News: ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याचे ठाकरे गटाचे खंदशिलेदार शिवसेनेत जाणार असल्याने ठाकरे गटाला पुण्यात मोठा धक्का सहन करावा लागणार आहे.
Balasaheb chandere : मागील काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. त्यात उद्धव ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के सहन करावे लागले. आता पुण्यातही उद्धव ठाकरे (udhav thackeray) गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी शिंदेच्या (Eknath shinde) शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याचे ठाकरे गटाचे खंदशिलेदार शिवसेनेत जाणार असल्याने ठाकरे गटाला पुण्यात मोठा धक्का सहन करावा लागणार आहे.
आज संध्याकाळी बाळासाहेब चांदेरे यांचा मुंबईत पक्ष प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चांदेरे यांच्यासह अनेकजण शिंदे गटात करणार प्रवेश करणार आहेत. भोर वेल्हा मुळशी या भागतील अनेक शिवसैनिक ठाकरेंची साथ सोडणार आहे. पुणे जिल्ह्यात चांदेरे भोर विधानसभा लढण्यासाठी ईच्छुक आहेत. मात्र महा विकास आघाडीत भोर मतदार संघ काँग्रेसकडे असल्याने चांदेरे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत करणार प्रवेश करणार आहेत. या आधी सुरुवातीला रमेश कोंडे यांनी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे.
ठाकरे गटाकडून लगेच हकालपट्टी...
चांदेरे यांची पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ठाकरे गटाने पत्र काढत ही माहिती दिली आहे. पुणे जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे माननीय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे, असं पत्रात नमुद केलं आहे.
का सोडला ठाकरे गट?
महाविकास आघाडीत काम करत असताना घुसमट होत होती. पाहिजे तसा वाव मिळत नव्हता. त्यामुळे मी पदाचा राजीनामा दिला आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्याचं काम करू, असं बाळासाहेब चांदेरे यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब चांदेरे यांनी पुरंदर, हवेली आणि भोर या तीन तालुक्यात ठाकरे गटाचं मोठं काम केलं आहे. या तीन तालुक्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे शिंदे गटाला या तीन तालुक्यात पाय रोवण्यास मदत होणार आहे. शिंदे गटाने पुण्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणीला चांगलीच सुरुवात केली आहे.