Lonavala Rain : गेल्या 24 तासात लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद; पुढील पाच दिवस वातावरण कसं असेल?
लोणावळ्यात गेल्या 24 तासांत यंदाच्या मोसमातील विक्रमी पावसाची नोंद होऊनही, पावसाबाबतची चिंता कायम आहे. लोणावळ्यात गेल्या 24 तासांत 214 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
Lonavala Rain : लोणावळ्यात गेल्या 24 तासांत यंदाच्या मोसमातील विक्रमी पावसाची नोंद होऊनही, पावसाबाबतची चिंता कायम आहे. लोणावळ्यात गेल्या 24 तासांत 214 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुणे जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण असलेल्या लोणावळ्यात सोमवारी यंदाच्या मोसमातील विक्रमी पाऊस कोसळला. गेल्या 24 तासांत इथं तब्बल 214 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पण त्यामुळे अख्ख्या मोसमातल्या पावसाची घट भरुन निघालेली नाही. यंदा आतापर्यंत झालेला पाऊस हा गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे.
गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2515 मिलीमीटर पाऊस झाला होता. यंदा मात्र केवळ 1524 मिलीमीटर इतकाच पाऊस कोसळला आहे. ही चिंतेची बाब मानली जात आहे. कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनादेखील चांगलाच फटका बसला आहे. अनेकांच्या पेरण्यादेखील रखडल्या. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
पुढील काही दिवस वातावरण कसं असेल?
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुणे आणि आसपासच्या भागांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंंदाज वर्तवला आहे. घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 19 जुलै रोजी ढगाळ आकाश आणि मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा घाट भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. रहिवाशांना आवश्यक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 20 आणि 21 जुलै घाट भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 22 आणि 23 जुलै रोजी पुण्यात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. याच कालावधीत घाट भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
कोणत्या परिसरात किती पाऊस?
आयएमडीच्या अहवालानुसार, गेल्या 24 तासात मुळशीमध्ये 56.5 मिमी तर जुन्नरमध्ये 37.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर शिरगावमध्ये 160 मिमी, ताम्हिणी घाटमध्ये 201 मिमी, खोपोलीमध्ये 2015 मिमी, लवासामध्ये 111.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
नागरिकांनो काळजी घ्या...
पुण्यात आणि असपासच्या परिसरात सह्याद्रीच्या डोंगररांगा आहेत. त्यामुळे पावसाळ्यात याच डोंगररांगेत वसलेल्या अनेक धबधब्यांवर पर्यटक गर्दी करत असतात. शनिवारी-रविवारी याच काही स्थळांवरील गर्दीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाले होते. आतापर्यंत किमान दोन ते तीन जणांचा ट्रेक करताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
हेही वाचा-