Pune Crime news : मॅट्रिमोनियल साइट्सवर जोडीदार शोधायला गेल्या अन् सायबर भामट्याच्या जाळ्यात अडकल्या, नेमकं काय घडलं?
ऑनलाईन जोडीदार शोधत असलेल्या दोन तरुणींची सायबर चोरट्यांकडून फसवणूक करण्यात आली आहे. जीवनसाथी या वेबसाईट वर ओळख झालेल्या तरुणाने 2 मुलींना तब्बल 23 लाख गंडा घालण्यात आला आहे.
Pune Crime news : सध्या सगळीकडेच मॅट्रिमोनियल साइट्सवर स्वत:चा जोडीदार शोधतात. या साइट्सवरुन एकमेकांचे फोटो पाहून त्यांनी आपला उत्तम जोडीदार निवडावा यासाठी या वेबसाईट तयार करण्यात आल्या आहेत आतापर्यंत अनेकांनी या वेबसाईटचा वापर करुन आपले जोडीदार निवडले आहेत. मात्र याच वेबसाईटचा चुकीचा वापर करण्यात आल्याचं पुण्यात घडलेल्या एका घटनेतून समोर आलं आहे. पुण्यात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. त्यात सायबर गुन्हे आणि फसवणुकींचं प्रमाणदेखील वाढत आहे. त्यातच ऑनलाईन जोडीदार शोधत असलेल्या दोन तरुणींची सायबर चोरट्यांकडून फसवणूक करण्यात आली आहे. जीवनसाथी या वेबसाईटवर ओळख झालेल्या तरुणाने 2 मुलींना तब्बल 23 लाख गंडा घालण्यात आला आहे.
मौल्यवान भेट वस्तू पाठवतो आहे असे भासवत तरुणींची फसवणूक केली. याप्रकरणी 29 वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेची आणि आरोपी विराट पटेल यांची जीवनसाथी या संकेतस्थळावर ओळख झाली. त्याने आपण बाहेरच्या देशात काम करतो असे भासवत त्याने मौल्यवान भेटवस्तू पाठवले आहे असे सांगितले पण दिल्ली विमानतळावर कस्टमने अडकल्यामुळे ते सोडवायला पैसे पाठव, असे तरुणीला सांगितले.
सुरुवातीला 30 हजार रुपये घेतल्यानंतर डिलिव्हरी चार्ज, इन्कम टॅक्स, इम्पोर्ट टॅक्स असे वेळोवेळी बतावणी करून त्या तरुणीचे तब्बल 13 लाख रुपये पाटीलने लंपास केले. त्यासोबतच असाच प्रकार पुण्यातील खराडी येथे राहणाऱ्या एका तरुणी बाबत घडला आणि तिची 10 लाख 30 हजार रुपयाची फसवणूक करण्यात आली आहे.
पुण्यात सायबर चोरांचा धुमाकूळ
पुण्यात सध्या सायबर चोरांनी धुमाकूळ घातला आहे. रोज नव्या फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. त्यात नव्या प्रकारचे सायबर गुन्हेदेखील समोर येत आहे. त्यासोबतच रोज अनेकांना गंडा घातला जात आहे. गेल्या 1 वर्षात सायबर गुन्हा संदर्भात 20 ते 22 हजार तक्रार सायबर पोलिसात दाखल होतात. घर बैठे पैसे कमाओ या अगदी सोप्या वाक्यांना अनेक लोक बळी पडतात आणि अनेक वेबसाईटवर ओळख लपवून फसवणूक करतात. आमिष किंवा परताव्याचे पैसे मिळत असल्याने सायबर चोरांच्या जाळ्यात देखील अडकतात. त्यामुळे अशा कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.