(Source: ECI/ABP News/ABP Majha)
म्हैसाळमधील अवैध स्त्री भ्रूणहत्या प्रकरणी तात्काळ सक्षम सरकारी वकिलांची नेमणूक करा; डॉ.नीलम गोऱ्हेंचे सरकारला निर्देश
Sangli News Update : सांगलीतील म्हैसाळमधील अवैध स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणात तात्काळ सक्षम सरकारी वकिलांची नेमणूक करा असे विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सरकारला निर्देश केलेत.
Sangli News Update : सांगलीतील म्हैसाळमधील अवैध स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणात तात्काळ सक्षम सरकारी वकिलांची नेमणूक करा असे विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सरकारला निर्देश केलेत. याशिवाय शासनाच्या काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाने आरोपी डॉ.बाबासाहेब खिद्रापुरे यांना जामीन मिळाला याबाबत ही नीलम गोऱ्हे यांनी खंत व्यक्त केली आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालविण्याबाबत ही सूचना केल्या असून शासनाच्या ज्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाने आरोपी डॉ.बाबासाहेब खिद्रापुरे यांना जामीन मिळाला, त्याच्यावर गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी याबाबत त्वरित कार्यवाही करण्याची नीलम गोऱ्हे यांनी मागणी केलीय.
सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे सन 2017 मध्ये अवैध गर्भपात करून स्त्रीभ्रूणहत्या करण्याचा चिंताजनक प्रकार घडला होता. या प्रकाराने संपूर्ण समाजात मोठ्या प्रमाणात चिंता निर्माण झाली होती. 2018 मध्ये विशेष सरकारी वकील म्हणून निंबाळकर यांची नेमणूक करण्यात आलेली होती, मात्र त्यांनी वेळोवेळी आजारपणाचे निमित्त करून या प्रकरणामध्ये कोणतीही प्रगती केलेली नाही असे दिसून आले आहे.
याच संदर्भात विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी 1 फेब्रुवारी, 2022 रोजी गृहमंत्री, आरोग्यमंत्री यांच्या समवेत बैठक आयोजित केली होती. या बैठकीस आज 12 दिवस झालेले असून याबद्दल करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल त्वरीत सदर करण्याची सूचना प्रशासनास देण्याचे पत्र आज उपसभापती कार्यालयाच्या वतीने देण्यात आले आहे. यात फक्त शासनाच्या काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाने आरोपी डॉ.बाबासाहेब खिद्रापुरे यांना जामीन मिळाला, ही अतिशय खेदकारक बाब सदरील बैठकीत समोर आली असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी म्हंटले आहे. यात गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या समोर दिले होते याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी.
तसेच यासंदर्भात पुढील निर्देश देखील डॉ.गोऱ्हे यांनी प्रशासन दिले आहेत यात सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील अवैध स्त्री भ्रूणहत्या घटनेत विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वला पवार किंवा सक्षम वकील यांची नेमणूक करून केस द्रुतगती न्यायालयात चालविण्यात यावी. या प्रकरणी त्वरीत निकाल मिळण्याच्या दृष्टीने तात्काळ सरकारी वकील नेमणूकीबद्दल कार्यवाही करावी.
सदरील म्हैसाळ घटनेत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी सूचना डॉ.गोऱ्हे यांनी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, विभागीय आयुक्त महसूल पुणे,विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर, पोलीस अधीक्षक- सांगली यांना केली आहे.