Video : आईचा आशीर्वाद, डोळ्यात पाणी; पंकजा मुंडेंच्या विजयानंतर प्रीतम मुंडे भावूक, समर्थकांचा जल्लोष
पंकजा मुंडेंच्या विजयाचा मुंडे कुटुंबीयांना अत्यानंद झाला असून संपूर्ण मुंडे फॅमिली विधानसभा परिसरात एकत्र आहे
मुंबई : गेल्या 5 वर्षांपासून राजकीय अज्ञातवासात असलेल्या पंकजा मुंडेंचे अखेर राजकीय पुनर्वसन झालं आहे. तब्बल 10 वर्षांनी पंकजा मुंडेंसाठी (Pankaja munde) विजयाचा गुलाल उधळण्यात आला असून मुंडे कुटुंबीयांसाठी हा भावनिक क्षण आहे. त्यामुळेच, खासदारकीला पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर दु:खी झालेल्या प्रीतम मुंडेंच्या (Pritam munde) डोळ्यात आज आनंदाश्रू पाहायला मिळाले. विधानपरिषद निवडणुकीत 26 मतं घेऊन पंकजा मुंडे विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपने 5 उमेदवार उभे केले होते, भाजपच्या (BJP) पाचही उमेदवारांचा विजय झाला आहे. मात्र, भाजपच्या पंकजा मुंडेंचा विजय झाल्यानंतर विधिमंडळ सभागृहात मुंडे समर्थकांनी जल्लोष केला. तर, मुंडे कुटुंबीय भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं.
पंकजा मुंडेंच्या विजयाचा मुंडे कुटुंबीयांना अत्यानंद झाला असून संपूर्ण मुंडे फॅमिली विधानसभा परिसरात एकत्र आहे. या विजयानंतर माजी खासदार आणि पंकजा यांच्या बहीण प्रीतम मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना आज सर्वात मोठा आनंद झाल्याचं म्हटलं. यावेळी, प्रीतम मुंडेंच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळालं.
वडील आणि दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या परळी मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला. या पराभवानंतर विजयाचा गुलाल उधळण्यासाठी माजी मंत्री पकंजा मुंडेंना तब्बल 5 वर्षांची वाट पाहावी लागली. तत्पूर्वी, 2014 विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंनी परळी मतदारसंघातून धनंजय मुंडेंचा तब्बल 24 हजार मतांनी पराभव करत मोठा विजय मिळवला होता. त्याचवेळी, गावकी-भावकीप्रमाणे अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसह पंकजा मुंडेंनी आनंदोत्सव साजरा करत विजयाचा गुलाल उधळला. मात्र, त्या गुलालानंतर संसदीय राजकारणातील विजयाचा गुलाल उधळण्यासाठी तब्बल 10 वर्षांची वाट पाहावी लागली. त्यात, 2019 च्या पराभवानंतर जवळपास 5 वर्षांचा राजकीय वनवासच त्यांच्या नशिबी आला होता. त्यामुळे, आता 10 वर्षानंतर पंकजा मुंडेंनी कुटुंबीयांसह विजयाचा गुलाल उधळला.
पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपला
पंकजा मुंडेंचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाला. या पराभवानंतर पंकजा यांचे राजकीय पुनर्वसन केलं जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती, आणि मुंडे समर्थकांना अपेक्षाही होती. मात्र, त्यांचे राजकीय पुनर्वसन केवळ चर्चेतच राहिले. भाजपकडून अनेक नवख्या चेहऱ्यांना आमदारकी मिळाली. मात्र, पंकजा मुंडेंना वेट अँड वॉच करावे लागले. विधानपरिषदेनंतर राज्यसभेसाठीही भाजपच्या काही नेत्यांची नावे चर्चेत आली. त्यावेळीही, पंकजा मुंडेंचं नाव पुढे आलं. मात्र, पंकजा मुंडेंच्या पदरी त्यावेळीही निराशाच आली. विशेष म्हणजे गोपीनाथ मुडेंचे समर्थक असलेल्या भागवत कराड यांना राज्यसभेवर घेऊन केंद्रीयमंत्री बसवण्यात आलं. पण, पंकजा मुंडेंना पुन्हा वेटिंगवरच ठेवण्यात आलं. त्यातच, 2024 च्या लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आणि भाजपकडून पंकजा मुंडेंना तिकीट देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि बीडमधील सामाजिक असमतोलतेचा फटका बसल्याने त्यांचा पराभव झाला. त्यामुळे, विजयाच्या गुलाल पंकजा मुंडेंपासून आणखी दूर केला होता. पण, भाजपने विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडेंना यंदा संधी दिली. 2024 च्या 11 जागांवरील विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने 5 नावे जाहीर केली, त्यात पंकजा मुंडेंना संधी मिळाली अन् पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपुष्टात आला. पंकजा मुंडेंनी संसदीय राजकारणात नोव्हेंबर 2014 नंतर जुलै 2024 मध्ये विजयाचा गुलाल उधळला आहे. पंकजा यांच्या या विजयामुळे मुंडें समर्थकांनीही आंनदोत्सव साजरा केला.