Agniveer Scheme : कोल्हापूरमध्ये ‘अग्निवीर’ भरतीसाठी जय्यत तयारी; 1 लाखांहून अधिक उमेदवारांचे अर्ज दाखल
Agniveer Scheme : कोल्हापूरमध्ये 22 नोव्हेंबरपासून होणाऱ्या अग्निवीर भरतीसाठी 1 लाखांहून अधिक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. या भरतीसाठी यापूर्वीच ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.
Agniveer Scheme : कोल्हापूरमध्ये 22 नोव्हेंबरपासून होणाऱ्या अग्निवीर भरतीसाठी 1 लाखांहून अधिक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. या भरतीसाठी यापूर्वीच ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या भरतीसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे उमेदवारांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.
भरतीला येणाऱ्या उमेदवारांना राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावर एकत्र करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येकी 200 किंवा सैन्य दलाकडून मागणी होईल त्याप्रमाणे उमेदवारांना शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सोडण्यात येईल. त्याठिकाणी या उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या होतील.
उमेदवार एक दिवस आधीच कोल्हापूरमध्ये येण्याची शक्यता गृहित धरून सोयीसुविधांची पाहणी महापालिका, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. उमेदवारांना पाणी, शौचालय यांची व्यवस्था व्हावी यासाठी प्रशासनाने या परिसराची पाहणी केली. भरतीची ही प्रक्रिया टेंबलाई टेकडी येथील मराठा लाईफ इन्फट्रीच्या मैदानावर होणार आहे. पहिल्या टप्प्यात अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे वजन, उंची याची तपासणी होणार आहे. त्यानंतर धावणे, लांब उडी यासारख्या शारीरिक चाचण्या होतील. किमान महिनाभर ही प्रक्रिया सुरू राहील.
अग्निपथ योजनेंतर्गत, उमेदवारांना 4 वर्षांसाठी भरती केले जाईल. यामध्ये अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर टेक्निकल (एव्हिएशन/म्युनिशन एक्झामिनर), अग्निवीर क्लर्क/स्टोअर कीपर, टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन जनरल (8 वी पास) आणि अग्निवीर ट्रेड्समन टेक्निकल या पदांचा समावेश आहे.
भरतीसाठी पुढील तीन टप्प्यांमध्ये चाचण्या होतील
शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि सामायिक प्रवेश परीक्षा (लेखी परीक्षा). शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना 15 जानेवारी 2023 रोजी होणारी सामायिक लेखी परीक्षा (सीईई)द्यावी लागेल. अंतिम गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांना देशसेवेसाठी अग्निवीर म्हणून भारतीय लष्करात भर्ती होण्याबाबतचे पत्र देण्यात येईल. मेळाव्याच्या ठिकाणी येताना उमेदवारांनी मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे, पुरेशा प्रमाणात छायाचित्रे, प्रारुपात नमूद केल्यानुसार वैध प्रतिज्ञापत्र, रहिवासाचे प्रमाणपत्र तसेच जात प्रमाणपत्र यांसारखी सर्व कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
पगार किती असेल ?
- प्रथम वर्ष- 30,000 रुपये (तसेच लागू भत्ते)
- द्वितीय वर्ष- 33,000 रुपये (तसेच लागू भत्ते)
- तिसरे वर्ष- 36,500 रुपये (तसेच लागू भत्ते)
- चौथे वर्ष- 40,000 रुपये (तसेच लागू भत्ते)
इतर महत्वाच्या बातम्या