kolhapur Airport : कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी जमीन संपादनासाठी गती, दिवसात 8 एकर जमिनीची खरेदी
कोल्हापूर विमानतळावर खरेदीच्या बदल्यात 9 जमीन मालकांना 28 कोटी रुपयांचे चेक देण्यात आले. संपादित करण्यात येत असलेल्या जमिनीला चांगला दर दिला जात असल्याने लोकांचा प्रतिसाद मिळत आहे.
kolhapur Airport : कोल्हापूर विमानतळावर खरेदीच्या बदल्यात 9 जमीन मालकांना 28 कोटी रुपयांचे चेक देण्यात आले. संपादित करण्यात येत असलेल्या जमिनीला चांगला दर दिला जात असल्याने लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. उर्वरित जमीन संपादन करण्यासाठी संबंधित जमीन मालकांनी आपसांतील वाद मिटवून जमीन संपादनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे संचालक अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांनी केले आहे.
कोल्हापूर विमानतळ विकासासाठी आवश्यक जमीन संपादनासाठी 206 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. गडमुडशिंगी व तामगाव या दोन गावांतील 64 एकर जमीन संपादित करावी लागणार आहे. यापैकी गडमुडशिंगीमधील 34 गुंठ्यांपैकी 28 गुंठे जमीन यापूर्वीच खरेदी करण्यात आली आहे. उर्वरित जमीन मालकांकडून जमीन देण्यास नकार दिल्याने ही जमीन सक्तीने संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
गडमुडशिंगी येथील एकूण संपादित जमिनीपैकी आठ एकर जमिनीची खरेदी करण्यात आली. ही जमीन रेडीरेकनरच्या चार पट दराने खरेदी करण्यात आली. जमिन खरेदी झाल्यावर लगेच धनादेश मिळाल्याने शेतकरी उत्साही दिसून आले. उर्वरित जमीन संपादनाची प्रक्रियाही वेगाने राबविण्यात येणार आहे.
कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधेचा प्रत्यक्ष वापर सुरु
दुसरीकडे कोल्हापूर विमानतळावर प्रत्यक्ष नाईट लँडिंग सुविधेचा वापर सुरु झाल्याने विमानतळ विकासाच्या प्रकियेतील मैलाचा टप्पा पार पडला आहे. 3 नोव्हेंबरपासून नाईट लँडिंग सुविधा कार्यरत विमानतळावर कार्यरत झाली आहे. मात्र, प्रत्यक्ष वापर रविवारी रात्री प्रथमच झाला. मंत्री उदय सामंत यांच्या खासगी विमानाने सुरक्षित टेक ऑफ केल्याने कोल्हापूर विमानतळ 24x7 सेवेत असण्यावर शिक्कामोर्तब झाले.
रविवारी रात्री 8 वाजून 46 मिनिटांनी या विमानतळावरून पहिल्यांदाच खासगी विमानाचे टेक ऑफ झाले. उद्योग मंत्री उदय सामंत आणि त्यांचे कुटुंबीय तिरुपतीला विमानाने रवाने झाले. तीन तारखेपासून नाईट लँडिंग सुविधा सुरु झाली असली, तरी कोणत्याही एअरलाईन्सने अथवा खासगी विमान वापरकर्त्यांनी परवानगी मागितली नव्हती. मंत्री उदय सामंत यांनी तिरुपतीला जाण्यासाठी रविवारी विमानाचे नाईट टेक ऑफ करणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाला दिली होती. त्यानुसार रात्री 8 वाजून 46 मिनिटांनी त्यांच्या विमानाने तिरुपतीसाठी टेक ऑफ केले.
इतर महत्वाच्या बातम्या