अधिकाऱ्यांनी दुर्लक्षं केल्यामुळे मुंबई वेठीला धरली गेली : माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
आपल्या महाराष्ट्रातील ट्रान्समिशन आणि इतर विद्युत उपकरणं आधुनिक आहेत. त्यामुळे कुठेतरी दुर्लक्ष झालं, विद्युत वाहिनी लगेच दुरुस्त केली गेली नाही. तसेच अधिकाऱ्यांनीही हलगर्जीपणा केला. त्यामुळेच मुंबई वेठीला धरली गेली, असा आरोप राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
नागपूर : ग्रीड फेल झाल्यानं मुंबईसह एमएमआर भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने काही काळासाठी गोंधळ उडाला. याचा रस्ते वाहतुकीसह आणि लोकल सेवेला फटका बसला. तसेच ऑनलाईन वर्ग रद्द तर झाले तर परीक्षाही पुढे ढकलल्या गेल्या. यासंदर्भात बोलताना राज्याचे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, मुंबईत केवळ 2000 मेगावॅटच्यावर ट्रान्समिशन केल्यामुळे वीजपुरवठा खंडीत होणं हे दुर्भाग्यपूर्ण आहे आणि महाराष्ट्राची बदनामी करणारं आहे.
मुंबईत खंडीत झालेल्या वीजपुरवठ्यासंदर्भात बोलताना माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 'मुंबईत 2000 मेगावॅटच्या वर वीजपुरवठा खंडीत होणं हे दुर्भाग्यपूर्ण असून महाराष्ट्राची बदनामी करणारं आहे. गेल्या तीन दिवसांपासून कळवा ते तळेगाव वीजवाहिनी ब्रेकडाऊनमध्ये असून दुरूस्त केलेली नाही. मुंबईला वीजपुरवठा करण्याकरता कळव्याला फिडिंग करावं लागतं. त्यानंतर कळवा ते पडघा ही विद्युत वाहिनी सात वाजता ब्रेकडाऊनमध्ये गेली. आपल्या महाराष्ट्रातील ट्रान्समिशन आणि इतर विद्युत उपकरणं आधुनिक आहेत. त्यामुळे कुठेतरी दुर्लक्ष झालं, विद्युत वाहिनी लगेच दुरुस्त केली गेली नाही. तसेच अधिकाऱ्यांनीही हलगर्जीपणा केला. कारण पहिली विद्युत वाहिनी जेव्हा ब्रेकडाऊन झाली त्यावेळी ते 15 मिनिटांत दुरूस्त करणं गरजेचं होतं. आपल्याकडे आधुनिक उपकरणं असतानाही ते केलं गेलं नाही.'
पुढे बोलताना ते म्हणाले की, '25 हजार मेगावॅट ट्रान्समिशन आम्ही केलं आहे, तरी कधी ब्रेकडाऊन झालं नाही. यावेळी एवढं कमी ट्रान्समिशन करताना ब्रेकडाऊन होणं अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. दुसरी लाईन ब्रेकडाऊन होईपर्यंतही पहिलं ब्रेकडाऊन अटेंड होत नाही. असं होणं म्हणजे, कुठेतरी दुर्लक्ष केल्यामुळेच असं घडलं. तसेच सध्याची जी परिस्थिती मुंबईची आहे, अशा परिस्थितीत तीन तास लोकल, मेट्रो आणि परीक्षा खोळंबण म्हणजे दुर्भाग्यपूर्ण आहे.'
मुंबईत अशी घटना अनपेक्षितपणे आणि पहिल्यांदाच घडली असेल : चंद्रकांत पाटील
मुंबईत तब्बल तीन तास वीजपुरवठा खंडीत झाला असून ही घटना अनपेक्षितपणे आणि पहिल्यांदाच घडली असेल किंवा घडली असेल तर खूप वर्षांपूर्वी घडली असेल अशी घटना आज अचानक मुंबईत घडली. तातडीने सरकारने याबाबत धावपळ सुरु केली असेल पण अशा प्रकारच्या अटितटिच्या परिस्थितीत जी गती आवश्यक असते ती सरकारने दाखवली पाहिजे.