(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : नाशिकमध्ये पोलीस भरती प्रक्रियेचे सर्व्हर डाऊन, उमेदवार रात्रभर सायबर कॅफेवर!
नाशिकमध्ये पोलीस भरती प्रक्रियेचे सर्व्हर डाऊन झाले आहेत. त्यामुळं उमेदवार रात्रभर सायबर कॅफेवर थांबून अर्ज भरत आहेत
Nashik News : पोलीस भरतीची अर्जप्रक्रिया (Police recruitment process) अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, अशातच गेल्या दोन दिवसांपासून अर्ज प्रक्रियेची साईट जाम असल्यानं अर्जप्रक्रियेत अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळं नाशिकमध्ये (Nashik) उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे. अशा स्थितीत अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्याची मागणीही उमेदवारांकडून केली जात आहे.
राज्यामध्ये जवळपास 20 हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे. मात्र पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सर्वर डाऊनचा फटका बसत असून नाशिक जिल्ह्यातील अनेक सायबर कॅफेवर उमेदवारांनी गर्दी केली आहे. मात्र साईट चालू बंद होत असल्याने उमेदवारांची दमछाक होत आहे. त्यामुळे सायबर चालक देखील वैतागले असून अनेक विद्यार्थी पोलीस भरतीला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अनेक वर्षात पहिल्यांदाच राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस भरती होत असून मागील दहा बारा दिवसांपासून अर्जप्रक्रिया सुरू आहे. सध्या तीन दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र तत्पूर्वी दोन दिवसांपासून साईट जॅम असल्याने उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्व्हर डाऊन असल्याने अनेकांचे अर्धे अधिक अर्ज सबमिट होण्याचे बाकी आहेत, अनेकांचे चलन भरायचे राहिले आहेत, तर अनेकजणांच्या अजून अर्जच भरले नसल्याने मुदत वाढवून देण्याची मागणी केली जात आहे.
पोलीस भरतीसाठी जवळपास राज्यातल्या ग्रामीण भागात आणि शहरी भागात दोन्ही ठिकाणी मुलं अगदी जोरदार तयारी करतात. दोन दिवसांनी पोलीस भरती अर्जप्रक्रियेची तारीख संपणार आहे. मात्र जिल्ह्यातील बहुतेक मुलांचे फॉर्म भरणे झालेले नाही. अनेक वर्षानंतर एवढी भरती निघालेली आहे. जर आत्ताच आम्ही फॉर्म नाही भरला तर आम्ही पुढे काय करायचं? वय निघून चाललंय? घरच्यांनी ही शेवटची संधी म्हणून फॉर्म भरण्यास होकार दिला आहे? त्यातच आता सर्व्हर डाऊन झाल्याने काही सुचेनासे झाले असल्याचे अर्ज करण्यास आलेल्या विद्यार्थिनीने सांगितले.
अर्जप्रक्रियेची मुदत वाढवून द्या...!
दरम्यान सर्व्हर डाऊनमुळे अर्ज प्रक्रिया करणाऱ्या उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पोलीस भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या ज्या साईट वरती उमेदवारांना अर्ज करण्यात येत आहेत. मात्र सर्वर स्लो असल्याने उमेदवारांना फॉर्म भरताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. सातत्याने साईट चालू बंद होत असल्याने काही उमेदवारांना सायबर कॅफेमध्ये बसूनच रात्र जागून काढावी लागत आहे. त्यामुळे पोलीस भरतीची ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख वाढवून द्या अशी मागणी उमेदवार करत आहेत.
शेवटची संधी म्हणून फॉर्म भरतोय, मात्र...
अनेक वर्षांनंतर पोलीस भरतीची जाहिरात निघाली आहे. दोन वर्षांपासून सराव करतो आहे. मात्र मागील दोन ते तीन दिवसांपासून साईट बंद असल्याने फॉर्म भरला जात नाहीये. त्यामुळे मुदत वाढवून देणं आवश्यक आहे. कारण यापुढे कधी भरती येईल सांगता येत नसल्याने शेवटची संधी म्हणून सराव करतो आहे, मात्र सर्व्हर बंदमुळे अडचण येत असल्याचे उमेदवार नरेश खोटरे याने सांगितले.