अमरावतीतील पोलिस अधिकारी अनिल मुळे आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण?
अमरावतीच्या फेजरपुरा पोलीस स्टेशनमधील पीएसआय अनिल बंडेप्पा मुळे आत्महत्येप्रकरणी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
अमरावती : अमरावतीच्या फेजरपुरा पोलीस स्टेशनमधील पीएसआय अनिल बंडेप्पा मुळे यांनी 13 ऑगस्टला गळफास घेवून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. पण ही आत्महत्या का केली हे स्पष्ट झालं नव्हतं. आता या प्रकरणी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये पीएसआय अनिल मुळे रडत-रडत समोरच्या सहकाऱ्याला सांगत होते की, वरिष्ठ पोलीस अधिकारी माझं खूप नुकसान केल्याचं स्पष्ट संभाषणामध्ये ऐकायला मिळते. तब्येत बिघडल्याने मी रजा घेतली होती आणि बरं झाल्यानंतर हजर होण्यासाठी आलो. परंतु कोणीही कर्तव्यावर हजर करून घेतलं नाही. या ऑडिओ क्लिप मध्ये अमरावती शहराचे ACP विक्रम साळी आणि DCP शशिकांत सातव यांचं ही उल्लेख आहे.
याप्रकरणी अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयाने माहिती दिली की, हे ऑडिओ क्लिप 25 जूनची आहे. ज्यांचं संभाषण आहे ते रामदास पाटील, हिंगोली येथे येऊन भेटले आणि तेव्हा त्यांचं समाधान झाल होतं. सोबतच अनिल मुळे यांना API पदी प्रमोशन मिळाले आणि CID पुणे येथे नेमणूक दिली. परंतु त्यांनी केलेल्या कसुरी मुळे त्यांना शिक्षा मिळाली असल्याने पोलिस महासंचालक कार्यालयाकडूनच त्यांना पदोन्नतीवर बदली झालेल्या ठिकाणी सोडू नये असे लेखी आदेश असल्याने त्याला सोडण्यात आले नव्हते. PSI अनिल मुळे यांच्यावर एकाच प्रकरणात दोन वेळा शिक्षा झाली नसून त्यांना वेगवेगळ्या कारणाने सात वेळा शिक्षा झाली असल्याची माहिती पोलीस आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आली.
या ऑडिओ क्लिपमध्ये अनिल मुळे यांच्याशी ज्या व्यक्तीने संवाद साधला. ते हिंगोलीचे प्रशासकीय अधिकारी रामदास पाटील यांनी माहिती दिली की, अनिलने माझ्याशी 29 जून रोजी संभाषण झालेलं आहे. याप्रकरणी अमरावतीचे पोलीस उपआयुक्त विक्रम साळी यांना भेटलो. पण यावेळी फेजरपुराचे ठाणेदार मेश्राम यांनी अनिलला खूप त्रास दिलाय. सोशल मीडियावर आता अनिलच्या मृत्यूनंतर ही पोलीसांकडून एक ACP दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून बदनामी करणं सुरू आहे. जर अनिलला न्याय देणं होत नसेल तर दुसऱ्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांकडून तपास करून न्याय द्यावा अशी मागणी रामदास पाटील यांनी केली आहे.
आमचे लातूर प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती पोलिसात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक असलेल्या अनिल मुळे यांनी झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे . यावरून आता अनिल मुळेचे नातेवाईकांनी पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचामुळे आत्महत्या केल्याचा आरोप करत आहेत. सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी नातेवाईक करत आहे. अनिल मुळे हा तरुण पोलीस अधिकारी मूळचा लातूर जिल्ह्यातील तोंडार या गावचा आहे. आठ वर्षांपासून ते अमरावती येथे कार्यरत होते. त्याचा प्रमोशन काळ होता मात्र अमरावती येथील वरीष्ठ त्यांना रिलिव्ह करत नव्हते . यामुळे ते सतत मानसिक तणा वात होत. गृहमंत्रालयात निवेदन देऊन दाद ही मागितली होती त्यावर काहीही उपाय झाला नाही . शेवटी त्याने आत्महत्या केली याची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी अनिल मुळे यांच्या वडिलांनी केली आहे.