Yavatmal News : पंतप्रधान नरेंद्र मोदी चौथ्यांदा यवतमाळ दौऱ्यावर; 45 एकरवर होणार भव्य सभा, तयारीला वेग
Yavatmal News : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळ जिल्ह्यात येत आहेत. त्या निमित्य आयोजित या सभास्थळी सुमारे 500 हून अधिक विविध राज्यातील मजूर दिवस-रात्र मंडप उभारणीचे काम करत आहेत.
Yavatmal News यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा यवतमाळ (Yavatmal)जिल्ह्यातील दौरा निश्चित झाला आहे. 28 फेब्रुवारीला पंतप्रधान यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी (PM Modi) हे दीड लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधीत करणार आहे. या मेळाव्यासाठी भारी परिसरात या मेळाव्याची जय्यत तयारी केली जात आहे. या मेळाव्याच्या सभास्थळी 45 एकराच्या विस्तीर्ण जागेवरती सभामंडप उभारण्याचे काम सुरू आहे. विविध राज्यातून यवतमाळमध्ये दाखल झालेले सुमारे 500 हून अधिक मजूर या कामात व्यस्त आहे. दिवस-रात्र या मंडप उभारणीचे काम केले जात आहे.
राबत आहेत विविध राज्यातील 500 च्यावर कामगार
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्यातील भारी शिवार येथे येणार असल्याने पंतप्रधानांच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. या सभेच्या अनुषंगाने सकाळी 7 वाजता पासून तर रात्री उशिरापर्यंत 500 च्यावर मजूर महिलांना बसण्यासाठी डोम (सभामंडप) उभारणीत लागले आहे. यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागातील आग्रा, राजस्थान, हैदराबाद आदी राज्यातील शेकडो मजूर गेल्या तीन दिवसापासून सभा मंडपाचे काम करत आहे. नियोजनाच्या दृष्टीने विविध 30 समित्या गठित करण्यात आल्या असून या मेळाव्याच्या तयारीला वेग आला आहे. शहरापासून 5 किमी अंतरावर असलेल्या भारी गावाजवळ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. साधारणपणे 45 एकरच्या विस्तीर्ण जागेवर ही सभा घेतली जाणार आहे. त्या दृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे. जेसीबी मशीनने या जागेच्या सपाटीकरण सुरू आहे. 7 हेलिपॅडची निर्मिती जवळच असलेल्या विमानतळावर केली जात आहे. शिवाय विशेष रस्ता सुद्धा पंतप्रधान मोदींच्या आगमनासाठी तयार करण्यात येत आहे.
सभामंडप कोसळला, 4 कामगार जखमी
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणारा सभामंडप आज सकाळी कोसळला आहे. यात 4 कामगार जखमी झाले. त्यातील एक डोम उभा करण्याचे काम सुरू असतानाच पिल्लर जमिनीतून निखळला. त्यामुळे त्याचे खांब खाली क्रेनवर कोसळले. याठिकाणी काही कामगार देखील होते. परंतु काही कामगार सुदैवाने बचावले आहे, तर चार जण यात जखमी झाले आहेत.
पंतप्रधान चौथ्यांदा यवतमाळ दौऱ्यावर
पंतप्रधान मोदी हे चौथ्यांदा यवतमाळ जिल्हाच्या दौऱ्यावर येत आहेत. 2004 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते यवतमाळला आले होते. त्यांची जाहीर सभा पोस्टल ग्राउंडवर झाली होती. यानंतर 20 मार्च 2014 ला लोकसभा निवडणुकीपूर्वी आर्णीजवळ असलेल्या दाभडी येथे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आले होते. त्यावेळी त्यांनी ‘चाय पे चर्चा’तून देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी 16 फेब्रुवारी 2019 रोजी यवतमाळच्या पांढरकवडा येथे महिला बचत गटाच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी देखील ते आले होते. आता पुन्हा पंतप्रधान मोदी हे यवतमाळ येथे येत असल्याने महाराष्ट्र आणि यवतमाळ येथे येण्याची ही पंतप्रधानांची चौथी वेळ आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! मोदींच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणारा सभामंडप कोसळला; 4 कामगार जखमी