पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा विदर्भाच्या दौऱ्यावर; रामदास तडस आणि नवनीत राणांच्या प्रचारासाठी महायुतीचे शक्तिप्रदर्शन
PM Modi At Wardha: वर्धा आणि अमरावती लोकसभेतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान पुन्हा विदर्भवारी करणार आहेत. वर्ध्याच्या तळेगाव येथील प्रगती मैदानावरच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आलंय.
Wardha Lok Sabha: विदर्भात दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत. महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 19 एप्रिलला वर्ध्यात (Wardha Lok Sabha) येत आहेत. वर्धा आणि अमरावती लोकसभेतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान पुन्हा विदर्भवारी करणार आहेत. वर्ध्याच्या तळेगाव येथील श्यामजीपंत येथील प्रगती मैदानावरच्या 32 एकर जागेत या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 19 एप्रिलच्या सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास या भव्य जाहीर सभेत नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार आहे. या सभेच्या अनुषंगाने या ठिकाणी भाजपच्या वतीने सूक्ष्म नियोजन केले असून मोठा जणसमुदाय या सभेला उपस्थित राहणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.
वर्ध्यात नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार
देशभरात लोकसभा निवडणुकांचे पडघम केव्हाच वाजले असून या निवडणुकीतील पहिल्या टप्प्याच्या मतदानाला आता अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता पक्षातील दिग्गज नेतेही प्रत्यक्ष मैदानात उतरत जाहीर सभांमधून अखेरचा 'मास्टर स्ट्रोक' मारण्याच्या तयारीत आहे. अशातच सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) धामधुमीत दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचीही तयारी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा आपल्या सभेतून मतदारांना साद घालण्यासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत.
वर्ध्याच्या तळेगाव येथील प्रगती मैदानावर या भव्यसभेचे आयोजन करण्यात आले असून सध्याघडीला या मैदानाची पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मैदानाची चाचपणी केली गेली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार खासदार नवनीत राणा आणि वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ या सभेचा आयोजन करण्यात आलंय. त्याकरिता अमरावती आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मैदानाची निवड करण्यात आली आहे. तसेच सभेला वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी या मैदानाची निवड केली असल्याचे सांगण्यात आलंय.
भाजपच्या वतीने सभेचे सूक्ष्म नियोजन
वर्ध्याच्या तळेगांव श्यामजीपंत येथिल प्रगती मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली आहे. आमदार दादाराव केचे आणि सुमित वानखेडे यांच्या खांद्यावर या सभेची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या सभा स्थळावरून भाजपमध्ये मंथन झाले होते. आधी आर्वी आणि आता तळेगाव श्यामजीपंत येथील स्थळाची चाचपणी करण्यात आली आहे. दोन्ही मतदारसंघात या सभेचा प्रभाव पडेल, ही आशा भाजपला आहे. तर महाविकास आघाडीने देखील दोन्ही मतदारसंघात आपल्या उमेदवाराचा प्रचार जोरात सुरू केला आहे. त्यामुळे पंतप्रधान या सभेतून नेमकं कुणावर निशाणा साधतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या