तळकोकणात 25 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट, अत्यंत आवश्यक असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे : जिल्हाधिकारी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 25 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. सद्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून नागरिकांनी अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय.
![तळकोकणात 25 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट, अत्यंत आवश्यक असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे : जिल्हाधिकारी Orange alert in konkan till July 25, citizens should leave their homes only if absolutely necessary says collector तळकोकणात 25 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट, अत्यंत आवश्यक असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे : जिल्हाधिकारी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/22/d4b2227dce5d88554c07fae56f9cdb86_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सिंधुदुर्ग : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील तिलारी धरण आणि कर्ली, वाघोटनमधील पाणी पातळीत वाढ होऊन इशारा पातळीपर्यंत पोहचली आहे. नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाटबंधारे, महसूल, पोलीस, जिल्हा परिषद यंत्रणा सज्ज असून सावधानतेचा इशारा दिला आहे. कणकवली येथील गड नदीमधीलही पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने काही ठिकाणच्या लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी पाणी आल्याने वाहतूक बंद केली आहे. करुळ आणि भूईबावडा घाट बंद असून फोंडा आणि आंबोली मार्गे अजून वाहतूक सुरू आहे. आज आणि उद्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवल्याने नागरिकांनी सतर्क रहावे.
अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, प्रशासनाला सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी तसेच मदतीसाठी 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. अतिवृष्टीमुळे पाच घरांचे, एका गोठ्याचे जिल्ह्यात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे वैभववाडी तालुक्यातील सडुरे -गावधनवाडी येथील जयश्री बाबाजी सावंत, नाधवडे येथील संतोष झिलु बाणे यांच्या गोठ्याचे, उंबर्डे - भुतेवाडी येथील सुरेश रहाटे यांच्या घराची संरक्षक भिंत, बळीराम सीताराम दळवी यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान झाले आहे. मालवण तालुक्यातील वाक येथील बाबाजी सखाराम मेस्त्री यांच्या घरावर सागाचे झाड पडून नुकसान झाले आहे. शिळवणेवाडी - तळगाव येथील राजाराम तुकाराम चव्हाण यांचे जुने घर पडून नुकसान झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
खारेपाटण भुईबावडा गगनबावडा राज्य महामार्ग 171 वर झाड पडून काही काळ वाहतूक बंद झाली होती. सध्या हे झाड हटवण्यात आले असून वाहतूक सुरू झाली आहे. लोरे शिवगंगा नदीच्या पुलावर पाणी आलेले असून सदर ठिकाणी वाहतूक बंद केलेली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आचरा कणकवली कनेडी फोंडा उंबर्डे रामा 181 लोरे 2 मध्ये असलेल्या शिवगंगा पुलावरील पाण्याची पातळी वाढलेली असून पुलावरील वाहतूक बंद आहे. तिथवली खारेपाटण जामदा पुलावर पाणी आलेले असून वाहतूक बंद झाली आहे. शिरशिंगे येथे दरड कोसळली आहे. पण, कोणताही धोका नाही. आंबेरी पुलावर पाणी अल्याने येथील वाहतूकही बंद असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)