भर पावसात आजारी आजीला पाठीवर घेऊन नातू तीन किमी पळाला!
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील पिंप्राळा या गावात रस्ता नसल्याने एका गावकऱ्यावर चक्क आजारी आजीला तीन किलोमीटर पाठीवर घेऊन जाण्याची वेळ इथल्या आली.
परभणी : परभणी जिल्ह्यात मुख्य रस्त्याबरोबरच ग्रामीण भागातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे हाल ही अत्यंत दयनीय झाले त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गावकऱ्यांना मोठ्या हाल-अपेष्टा सहन करावे लागत आहेत. जिंतूर तालुक्यातील पिंप्राळा या गावात रस्ता नसल्याने चक्क आजारी आजीला तीन किलोमीटर पाठीवर घेऊन जाण्याची वेळ इथल्या एका गावकर्यावर आली. तरीही ना प्रशासन ना लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे लक्ष देत आहेत.
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील पिंप्राळा या संपूर्ण आदिवासी लोकवस्ती असणाऱ्या गावातील 85 वर्षीय कौसाबाई चाफे यांना अचानक जुलाब आणि उलट्या सुरु झाल्या. गावातील खाजगी इलाज करुनही त्यांना काहीही फरक पडला नाही. अखेर या आजीच्या 18 वर्षीय नातू राजकुमार चाफेने तिला कापडाने पाठीवर बांधून पुढील इलाजासाठी जिंतूरला नेण्याचे ठरवलं आणि चिखल तुडवत तब्बल तीन किलोमीटर पायीच घेऊन गेला.
भर पावसात आजारी आजीला पाठीवर घेऊन तो तीन किलोमीटर पळाला! #परभणी जिल्ह्यातील जिंतूरमधील पिंप्राळा गावकऱ्यांचे रस्त्याअभावी हाल. @pankaj_pbn pic.twitter.com/4NZ4esek7B
— ABP माझा (@abpmajhatv) September 28, 2020
स्वातंत्र्यापासून या गावातील नागरिकांच्या वाट्याला अशीच परिस्थिती आहे. कारण या गावाने अजूनही पक्का रस्ता पाहिलेला नाही, रस्ता नसल्याने कित्येक महिलांची वाटेतल्या माळरानावर प्रसुती झाली आहे. अनेक मुला-मुलींनी शिक्षण अर्धवट सोडलं. अर्धांगवायू, हृदयविकार अशा अवस्थेचे रुग्ण कायम चालू झाले आहेत.
वेळोवेळी लोकप्रतिनिधींना साकडे घातल्यानंतर या गावातील ग्रामस्थांनी प्रशासकीय यंत्रणेकडे याबाबत लेखी पाठपुरावा केला. परंतु प्रशासन अन् लोकप्रतिनिधींनी याकडे कानाडोळा केला आहे त्यामुळे या गावकऱ्यांना पक्का रस्ता केव्हा मिळणार हा प्रश्नच आहे.