फरार घोषित करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती द्या, परमबीर यांचा मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टात अर्ज
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एका पत्राद्वारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर दरमहा 100 कोटी रुपये वसुलीचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप केले.
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करत असलेल्या चांदिवाल आयोगासमोर परमबीर सिंह सोमवारी हजर होणार असल्याची माहिती शुक्रवारी परमबीर यांच्या वकिलांकडून आयोगाला देण्यात आली.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एका पत्राद्वारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर दरमहा 100 कोटी रुपये वसुलीचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप केले. मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेची दखल घेत सीबीआय चौकशीचे आदेश दिले. तर राज्य सरकारनंही या आरोपांची समांतर न्यायालयीन चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगामार्फत चौकशी सुरू केली आहे.
गुरुवारी पार पडलेल्या आयोगाच्या सुनावणीदरम्यान, परमबीर सिंह यांना आयोगासमोर हजर राहण्यास सांगा, अन्यथा पोलिसांना त्याच्यांविरोधात जामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले जातील, असं आयोगानं त्यांच्या वकिलांना बजावलं होतं. तसेच परमबीर सिंह कुठे आहेत?, अशी विचारणाही आयोगानं केली होती. त्यावर शुक्रवारी परमबीर यांच्यावतीनं बाजू मांडताना, परमबीर हे एका खटल्यासंदर्भात दंडाधिकारी न्यायालयात आहेत. त्यामुळे ते शनिवारी आयोगासमोर हजर राहण्यास तयार असल्याची माहिती त्यांच्या वतीनं देण्यात आली. मात्र, शनिवारी आयोगाचं कामकाज होत नसल्यानं परमबीर यांना सोमवारी आयगोसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
फरार प्रकरणी पोलिसांनी भूमिका स्पष्ट करावी
परमबीर सिंह यांनी फरार गुन्हेगार घोषित करण्याच्या आदेशाविरोधात मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर मुंबई पोलिसांनी भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. दंडाधिकारी एस. बी. भाजीपाले यांनी मागील आठवड्यात परमबीर सिंह यांना गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या एका प्रकरणात फरार गुन्हेगार घोषित केलेलं आहे. शुक्रवारी सिंह यांनी हा आदेश रद्दबातल करण्याच्या आणि न्यायालयानं जारी केलेलं अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याच्या मागणीसाठी अर्ज केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला तूर्तास अटकेपासून संरक्षण दिल्याच्या पार्श्वभूमीवर आता फरार गुन्हेगार म्हणून घोषित करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती द्यावी अशी मागणीही त्यांनी कोर्टाकडे केली आहे.
अनिल देशमुखांनाही मंगळवारी आयोगासमोर हजर करणार
परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंगळवारी चांदीवाल आयोगासमोर हजर केलं जाणार आहे. आयोगाच्यावतीनं मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टात त्यासंदर्भात अर्ज दाखल केला होता. त्याची दखल घेत न्यायालयानं अनिल देशमुख यांना मंगळवारी सकाळी 11 वाजता आयगोसमोर हजर करावे, आणि चौकशीअंती त्यांची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.
संबंधित बातम्या :