(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिराला नित्यपूजेतून एक कोटीचं उत्पन्न, 2024 सालातल्या पूजेसाठी बुकिंग फुल
भाविकांना मंदिर समितीकडे तारखेचं बुकिंग करून विठ्ठलाच्या नित्यपूजेसाठी 25 हजार आणि रूक्मिणी मातेच्या नित्यपूजेसाठी 11 हजार रूपयांची रक्कम भरणं आवश्यक असतं.
पंढरपूर : पंढरपूरच्या (Pandharpur) विठ्ठल आणि रूक्मिणी मंदिरात पहाटे होणाऱ्या एकमेव नित्यपूजेसाठी 2024 या कॅलेंडर वर्षातील सर्व बुकिंग्स आताच फुल झाल्या आहेत. त्यातून दोन्ही मंदिरांना मिळून एक कोटीपेक्षा अधिकचं उत्पन्न मिळालं आहे.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात देवाची रोज एक नित्यपूजा करण्यात येते. त्यामध्ये चार यात्रांचा आणि इतर ठराविक कालावधी वगळून 300 नित्यपूजांसाठी बुकिंग घेण्यात आलं. 2024 सालच्या दैनंदिन नित्यपूजेच्या बुकिंगमधून विठ्ठल मंदिराला 75 लाख रुपये तर रुक्मिणी मंदिराला 33 लाख रुपये उत्पन्न मिळालं आहे. दररोज पहाटे चार ते पाच या वेळेत विठ्ठल आणि रूक्मिणी मातेची नित्यपूजा करण्यात येते. त्यासाठी भाविकांना मंदिर समितीकडे तारखेचं बुकिंग करून विठ्ठलाच्या नित्यपूजेसाठी 25 हजार आणि रूक्मिणी मातेच्या नित्यपूजेसाठी 11 हजार रूपयांची रक्कम भरणं आवश्यक असतं. त्यानुसार त्या तारखेला संबंधित भाविक आणि त्यांच्या नातेवाईकांना मिळून दहाबारा लोकांना नित्यपूजेसाठी मंदिरात प्रवेश देण्यात येतो
राज्यात दोन वर्षांपूर्वी कोरोना संकट सुरु झाल्याने शासनाच्या नियमानुसार मंदिरे बंद झाली आणि 18 मार्च 2020 पूर्वी ज्या भाविकांनी या नित्यपूजा नोंदणी केली होती त्या पूजा झाल्या नव्हत्या. जानेवारी महिन्यात पुन्हा नित्य पूजा सुरू करण्यात आल्या पुरातत्व विभागाच्या आदेशानुसार विठ्ठल मूर्तीची झीज टाळण्यासाठी पूर्वी होत असलेल्या महापूजा बंद करून रोज होणाऱ्या नित्यपूजेत भाविकांना सहभागी करून घेण्यास सुरुवात झाली . त्यानुसार रोज पाच भाविक कुटुंबांची नित्यपूजेसाठी नोंद केली जाते.
पहिली वारी चैत्री यात्रा
चैत्री यात्रेसाठी (Chaitri Yatra) राज्यभरातील भाविक पंढरपूरमध्ये (Pandharpur) दाखल झाले आहेत. दरवर्षी पंढरपुरात मुख्य चार वाऱ्या असतात. यातील पहिली वारी ही चैत्री यात्रा असते. चैत्र महिना हा नवीन वर्षातील पहिला महिना आहे. पंढरपुरात चैत्र शुद्ध एकादशीस म्हणजेच कामदा एकादशीस यात्रा भरते. सारे भाविक चंद्रभागा स्नान, विठ्ठल-रुक्मिणी दर्शन, पंढरी प्रदक्षिणा, भजन-कीर्तन करुन ही यात्रा साजरी करतात. राज्यातील कानाकोपर्यातुन पंढरीकडे श्रीविठ्ठल दर्शनासाठी येतात.
पंढरपुरात चार यात्रा
चैत्री यात्रेनंतर आषाढी यात्रा ही पंढरीतील महायात्रा म्हणून ओळखली जाते. आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस ही यात्रा भरते. या एकादशीस देवशयनी एकादशी म्हणतात. त्यानंतर कार्तिकी यात्रा ही कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीस पंढरपुरात साजरी केली जाते. सर्वात शेवटी माघी यात्रा माघ महिन्यातील शुद्ध एकादशीस भरते. या एकादशीस जया एकादशी म्हणतात. ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन चालु असते. वारकरी विठ्ठल नाम गजरात तल्लीन होतात.