Pandharpur: पंढरपूर विकास आराखडा आंदोलनात फूट! कर्नाटक मुख्यमंत्र्यांना पूजेला बोलावण्यासंदर्भातील वक्तव्याचा मनसेकडून निषेध
आराखडा रद्द न झाल्यास पुढच्या आषाढीला कर्नाटक मुख्यमंत्र्यांना पूजेला बोलावू अशा पद्धतीच्या धक्कादायक वक्तव्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे.
Pandharpur Mauli Corridor: पंढरपूर विकास आराखडा आणि कॉरिडॉर विरोधी आंदोलनकर्त्यांनी आमच्यावरील अन्याय दूर न झाल्यास आषाढीला कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना बोलावण्याचा मतप्रवाह तयार होत असल्याचे धक्कादायक वक्तव्य केल्याने खळबळ माजली आहे. हा आराखडा रद्द न झाल्यास पुढच्या आषाढीला कर्नाटक मुख्यमंत्र्यांना पूजेला बोलावू अशा पद्धतीच्या धक्कादायक वक्तव्यानंतर या आंदोलनाची सुरुवात करणारे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी याला कडाडून विरोध करत वेगळी भूमिका घेतल्याने आता आंदोलनात फूट पडण्याची शक्यता दिसू लागली आहे.
मंदिर परिसरातील शेकडो व्यापारी आणि नागरिकांच्या घरावर बुलडोझर फिरवू नये यासाठी धोत्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हे आंदोलन उभे केले होते. मात्र आज ठिय्या आंदोलनाच्या दरम्यान हा आराखडा रद्द न झाल्यास कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना आषाढी पूजेस बोलावण्याची मानसिकता काही जणांची झाल्याचे वक्तव्य रामकृष्ण महाराज वीर आणि इतरांनी केल्यानंतर मनसे आता आक्रमक झाली असून ज्याला कर्नाटकात जायचे त्याने खुशाल जावे. मात्र कर्नाटक मुख्यमंत्री पंढरपूरला आल्यास त्याला जोडे मारून पळवून लावू असा इशारा दिला.
मंदिर परिसरात कोणताही आराखडा आम्ही राबवू देणार नसून त्यासाठी आम्ही खंबीर आहोत. यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलावण्याची भाषा करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही उभे राहू असे दिलीप धोत्रे यांनी सांगितले आहे. कर्नाटक मुख्यमंत्र्यांना बोलावण्याचा मुद्द्यावर आता अनेक नेते या आंदोलनास विरोध करू लागल्याने हे वक्तव्य मागे घ्यावे यासाठी आंदोलकातून दबाव वाढत चालला आहे.
एकाबाजूला कर्नाटकचे मुख्यमंत्री कधी जत तरी कधी सोलापूर अक्कलकोटला कर्नाटकात जोडण्याची भाषा करीत असताना आज पंढरपूर विकास आराखडा आणि कॉरिडॉर विरोधी आंदोलनकर्त्यांनी आमच्यावरील अन्याय दूर न झाल्यास आषाढीला कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना बोलावण्याचा मतप्रवाह तयार होत असल्याचे धक्कादायक वक्तव्य केले होते.
मंदिर परिसरात भविष्यात भाविकांना जास्तीत जास्त सुविधा देता याव्यात यासाठी पंढरपूर विकास आराखडा आणि माउली कॉरिडॉर राबविण्याची तयारी प्रशासनाने सुरु केली आहे. एका बाजूला शासन या बाधित नागरिक आणि व्यापाऱ्यांशी चर्चा करीत असताना दुसऱ्या बाजूला यासाठीचे टेंडर प्रसिद्धीस दिल्याने असंतोष वाढत चालला आहे. आज सकाळपासून विठ्ठल मंदिराच्या पश्चिम द्वार समोर शेकडो व्यापारी आणि परिसरातील नागरिक स्त्री पुरुषांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. यामध्ये नो कॉरिडॉर असे काळे फलक आणि काळे झेंडे घेऊन हे बाधित नागरिक शासन आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत.
यावेळी या आराखड्याला विरोध करणाऱ्या संघर्ष समितीचे अध्यक्ष रामकृष्ण महाराज वीर यांनी आता जर शासनाने हा आराखडा मागे नाही घेतलं तर पुढच्या आषाढीच्या पूजेला कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांना बोलवावे लागेल असा मतप्रवाह बनत असल्याचे धक्कादायक वक्तव्य केल्याने आता वाद अजून चिघळत जाण्याची चिन्हे आहेत. एका बाजूला कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज महाराष्ट्राच्या भूमीवर वेगवेगळे दवे करीत असताना या आंदोलकांच्या प्रतिक्रियेमुळे कर्नाटक मुख्यमंत्र्यांना नवीनच दावा करण्याची संधी मिळणार आहे. राज्य शासनाने स्थानिकांना विश्वासात न घेता या आराखड्या संदर्भात घेण्यात येऊ लागलेले निर्णय यासाठी कारणीभूत ठरत असले तरी अशा फुटीरतावादी वक्तव्याने आंदोलनाची दिशा भरकटण्याची चिन्हे आहेत.
ही बातमी देखील वाचा