फर्निचर व्यापाऱ्याने बेडमध्ये साडीत गुंडाळून ठेवलेले दागिने, रोकड लंपास; 16 लाखांच्या मुद्देमालाची चोरी
पंढरपूरचे फर्निचरचे व्यापारी अजित फडे यांनी त्यांच्या बेडमध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू साडीत गुंडाळून ठेवल्या होत्या. परंतु चोरट्यांनी हे दागिने लंपास केले आहेत.
पंढरपूर : फर्निचर व्यापाऱ्याने बेडमध्ये साडीत गुंडाळून ठेवलेले 15 लाख 70 हजार रुपयांचे दागिने चोरट्याने पळवल्याची घटना पंढरपुरात घडली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही चोरी नेमकी कधी याचाही अंदाज व्यापाऱ्याला नाही. त्यामुळे 1 ते 13 डिसेंबरदरम्यान ही चोरी झाली असावी असा अंदाज त्याने पोलिसात तक्रार देताना व्यक्त केला.
पंढरपूरचे फर्निचरचे व्यापारी अजित फडे यांनी त्यांच्या बेडमध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू साडीत गुंडाळून ठेवल्या होत्या. चोरी झालीच तर दागिने सापडू नये यासाठी त्यांनी ही शक्कल लढवली होती. परंतु तरीही चोरटे हे दागिने लंपास करण्यात यशस्वी ठरले. विशेष म्हणजे ही चोरी नेमकी कधी झाली याची त्यांच्यासह घरातील कोणालाच कल्पना नव्हती.
दरम्यान अजित फडे यांच्या घरातून सोने, चांदी आणि रोख रक्कम असा एकूण 15 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल पळवून नेल्याची तक्रार त्यांच्या पत्नी संजीवनी फडे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान तक्रार मिळताच पोलीस निरीक्षक अरुण पवार आणि त्यांच्या टीमने घराची पाहणी करून तपासाला सुरुवात केली आहे.