Suryakumar Yadav : 'आपल्या देशाचे नेते फ्रंटफुटवर येऊन बॅटिंग करतात', मोदींच्या ट्वीटनंतर सूर्यानं पाकिस्तानला डिवचलं
Asia Cup India vs Pakistan: भारतानं आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानला 5 विकेटनं पराभूत करत नवव्यांदा विजेतेपद पटकावलं. भारताच्या टीमचं मोदींनी ट्वीट करत अभिनंदन केलं होतं.

नवी दिल्ली : आशिया कपच्या अंतिम फेरीत भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. तिलक वर्माच्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानला पराभूत केलं. भारतानं आशिया कप जिंकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत संघाचं अभिनंदन केलं होतं. मात्र, मोदींच्या ट्वीटमधील ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख पाकिस्तानला खटकला. नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विजयाला ऑपरेशन सिंदूरशी जोडून टीमला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावर आता टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं देशाचे नेते फ्रंटफूटवर येऊन फलंदाजी करतात हे खूप चांगलं वाटतं असं म्हटलं.
Suryakumar Yadav on Narendra Modi : सूर्यकुमार यादव नरेंद्र मोदींबाबत काय म्हणाला?
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं नरेंद्र मोदींनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल बोलताना म्हटलं की, "चांगलं वाटलं जेव्हा देशाचे नेते फ्रंटफुटवर येऊन बॅटिंग करत आहेत. हे असं आहे , तेच स्वत: स्ट्राईक घेत धावा करत आहेत. हे पाहून चांगलं वाटलं, आणि जेव्हा सर पुढे उभे असतील तेव्हा निश्चितपणे खेळाडू मोकळेपणानं खेळतील."
मोहसीन नक्वीच्या हस्ते ट्रॉफी न स्वीकारण्यावर सूर्या काय म्हणाला?
भारतानं पाकिस्तानला आशिया चषकाच्या फायनलमध्ये पराभूत केल्यानंतर आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वीच्या हस्ते आशिया कपची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. याबाबत बोलताना सूर्यकुमार यादवनं म्हटलं की, मी याला वाद म्हणणार नाही, लोकांनी ट्रॉफीचे फोटो इथे तिथे पोस्ट केले आहेत. मात्र, खरी ट्रॉफी तेव्हा असते जेव्हा तुम्ही लोकांचं मन जिंकता, जे लोक पडद्याच्या मागं काम करतात ते खरे ट्रॉफी आहेत. खरी ट्रॉफी मैदानावर या सर्व लोकांचं काम आणि प्रयत्न आहे, असं सूर्यकुमार यादवनं म्हटलं.
सूर्यकुमार यादवनं म्हटलं की सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पूर्ण देश आनंद साजरा करतोय. जेव्हा आम्ही भारतात परत जाू तेव्हा खूप चांगलं वाटेल आणि आम्हाला चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा आणि प्रोत्सान मिळेल.
मोदींकडून ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत शुभेच्छा
भारतानं तिलक वर्माच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानला अंतिम फेरीत 5 विकेटनं पराभूत करत नवव्यांदा विजेतेपद मिळवलं. पूर्ण स्पर्धेत भारतानं एकही सामना गमावला नाही. पाकिस्तान आणि भारत आशिया चषकात तीन वेळा आमने सामने आले. भारतानं तीन सामन्यात पाकिस्तानला पराभूत केलं. भारताच्या विजयानंतर नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं की " ऑपरेशन सिंदूर खेळाच्या मैदानात, निकाल सारखाच, भारताचा विजय, आपल्या क्रिकेटपटूंना शुभेच्छा"
भारतानं कॅप्टन सूर्यकुमार यादवनं आशिया कपमधून मिळणारं पूर्ण मानधन भारतीय सैन्य आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातीन पीडितांना दान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानं एक्सवर पोस्ट करत म्हटलं की मी या मालिकेचं पूर्ण मानधन आपल्या सशस्त्र दलांना आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
#WATCH | Dubai, UAE: On PM Modi's tweet "Operation Sindoor on the games field", Indian skipper Suryakumar Yadav says, "It feels good when the country's leader himself bats on the front foot; it felt like he took the strike and scored runs. It was great to see, and when the sir is… pic.twitter.com/nLLsgwuqPI
— ANI (@ANI) September 29, 2025























