'विठ्ठलाचं दर्शन घ्यायचंय? चार हजार गुगल पे करा..."; पंढरीत येणाऱ्या भाविकांची लूट
श्री विठ्ठल दर्शनास आलेल्या भाविकांना झटपट दर्शन करून देण्याचे काम करणारे एजंटना रविवारी मंदिरातच भाविकांसह पकडले आहे.
पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुराच्या पंढरपुरातील (Pandharpur) मंदिरात (Shri Vitthal Rukmini Mandir) काळाबाजार सुरु असल्याचे समोर आले आहे. विठोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून पैसे घेऊन दर्शनासाठी सोडण्यासाठी पैसे घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मंदिर समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोन्ही एजंटविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
श्री विठ्ठल दर्शनास आलेल्या भाविकांना झटपट दर्शन करून देण्याचे काम करणारे एजंटना रविवारी मंदिरातच भाविकांसह पकडले आहे. पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या शॉर्टकट पेड दर्शनाचा काळाबाजार पुन्हा एकदा समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातून आलेल्या भाविकांकडून ऑनलाईन चार हजार रुपये घेऊन दर्शन करून देण्याचा प्रकार समोर आलेला आहे. आता तरी मंदिर प्रशासन दर्शनाच्या या काळ्या बाजारावर कारवाई करणार का याकडे भाविकांचे लक्ष आहे
चार हजार रुपये गुगल पे वर घेतले
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भाविक चेतन कबाडी हे आपल्या सहकाऱ्यांसह श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दर्शनास आल्यानंतर संत नामदेव पायरी परिसरात प्रासादिक वस्तू विक्री करणाऱ्या एका इसमाची त्यांची भेट झाली. त्याने टोकन दर्शन सुरू आहे. त्याने प्रती व्यक्ती 1000 रुपये लागतील असे सांगून कबाडी यांच्याकडून चार हजार रुपये गुगल पे वर घेतले. कबाडी यांनी ज्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर केले त्याचे नाव सुमित संभाजी शिंदे असे आहे. दर्शन झाल्यानंतर कबाडी यांनी पोलिसांना ही बाब सांगितल्यानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
मंदिर समितीकडून कुठलीही कठोर कारवाई नाही
या प्रकरणामुळे दर्शनाचा काळा बाजार करणारी टोळी सक्रिय असल्याचा प्रकार पुढे आला आहे. दुसरीकडे या पैसे घेऊन दर्शन करून देणाऱ्यांच्या साखळीत मंदिरामधील कोणी सहभागी आहे का याचा उलगडा पोलीस तपासात होण्याची शक्यता आहे. मंदिरात यापूर्वी सुद्धा अनेक शॉर्टकट पेड दर्शनाचे असे प्रकार समोर आले आहेत. मात्र दर्शनाच्या काळ्या बाजाराची साखळी अद्याप समोर आली नाही. अथवा मंदिर समितीकडून याबाबत कुठलीही कठोर कारवाई केली नाही.
हे ही वाचा :
विठ्ठलभक्तांसाठी मोठी खुशखबर! भाविकांना आषाढीतही मिळणार केवळ 2 तासात दर्शन, 110 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर