Palghar ZP By Election : पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता कायम? शिवसेनेच्या जागा वाढल्या
Palghar ZP By Election : सध्या पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता आहे. पोटनिवडणुकांचे सर्व कल हाती आल्यानंतर महाविकास आघाडीचीच सत्ता कायम राहण्याची चिन्ह आहेत.
Palghar ZP By Election : पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणूकीत आतापर्यंत 15 जागांचे निकाल हाती आले आहेत. हाती आलेल्या निकालांनुसार, शिवसेना 5, भाजप 5, राष्ट्रवादी 4 तर माकपानं एका जागेवर विजय मिळवला आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या 15 तर पंचायत समित्यांच्या 14 जागांसाठी मतदारांनी काल (मंगळवारी) आपला कौल दिला. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं या जागा रद्द झाल्या असून याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसलेला पाहायला मिळाला. राष्ट्रवादीच्या 15 पैकी 7 जागा रद्द झाल्या असून शिवसेना 3, भाजप 4 तर माकपची एक जागा रद्द झाली होती.
सध्या पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता आहे. पोटनिवडणुकांचे सर्व कल हाती आले आहेत. निकालांनुसार, शिवसेना 5, भाजप 5, राष्ट्रवादी 4 तर माकपानं एका जागेवर विजय मिळवला आहे. म्हणजेच, आजच्या निकालानंतर पालघर जिल्हा परिषद निवडणुकांमधील आकडे लक्षात घेता, शिवसेनेकडे 20, राष्ट्रवादी 12, भाजप 11, काँग्रेस 1, अपक्ष 3 आणि इतर 10 जागा आहेत. त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता कायम राहण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्हा परिषद निवडणूक, आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 15 जागांचे निकाल हाती
शिवसेना : 5
भाजप : 5
राष्ट्रवादी : 4
माकपा : 1
जिल्हा परिषदेत सध्या महाविकास आघाडी सत्तेत असून शिवसेनेकडे अध्यक्ष तर राष्ट्रवादीकडे उपाध्यक्ष पद आहे. जिल्हा परिषदेत एकूण 57 जागा असून बहुमतासाठी 29 जागांची गरज आहे. या पोटनिवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाच्या जागा कमी जास्त झाल्या तरी जिल्हा परिषदेतील सत्तेत फरक पडणार नसला तरी महाविकास आघाडीत फूट पडल्यास येथे सत्ता बदलण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेकडे 18, राष्ट्रवादी काँग्रेस 15, भाजप 10, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 6, बहुजन विकास आघाडी 4 अपक्ष 3 तर काँग्रेसला एका जागेवर विजय मिळवण्यात यश आलं होतं. मात्र, सध्याच्या पोटनिवडणुकीत बहुतांशी जागांवर सेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली. या पोटनिवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. ती शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांची खासदारांच्या हट्टापायी जिल्हा परिषदेच्या डहाणू तालुक्यातील वणई गटाचा शिवसेनेचा सिटिंग उमेदवार डावलून खासदार राजेंद्र गावित यांचे चिरंजीव रोहित गावित यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे या गटातील शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर होता. तर भापज, सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अशी अटीतटीची लढत पाहायला मिळाली होती.