Padma Awards: हजारो वर्षापूर्वींची कळसूत्री बाहुल्याची कला जपली, गंगावणेंना याच कलेमुळं मिळाला पद्मश्री
Padma Awards 2021 Announced: परशुराम गंगावणे हे गेले 45 वर्षांपासून आदिवासी ठाकर समाजाच्या पारंपारीक लोककला जतन व प्रसार करण्याचे काम करीत आहे. कठिण परिस्थीतीमध्ये त्यांनी ही लोककला जपून ठेवली
सिंधुदुर्ग : ज्या काळात मनोरंजनाची साधनेच नव्हती, त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात गंगावणे यांनी कळसूत्री बाहुल्याची कला जपली आहे. परशुराम गंगावणे आणि त्यांचे कुटुंबीय कळसूत्री बाहुल्याची ही हजारो वर्षापूर्वीची कला जपत आहेत. या मंडळींकडे लिखित प्राचीन दस्तावेज नाही. मात्र पिढ्यानपिढ्या सांगत आलेल्या कथांमुळे या समाजातील प्रत्येकांच्या ओठावर ठाकरी शैलीतील रामायण, महाभारत ऐकायला मिळते, कळसूत्री बाहुल्यांच्या साथीने या अनेक लोककथांचे सादरीकरण करत असतात.
जन्मापासून वडील विश्राम, आजोबा आत्माराम यांच्या पावलावर पाऊल ठेवून आदिवासी कलेचा वारसा पुढे चालू राहावा यासाठी झटणाऱ्या परशुराम गंगावणेंनी गुरांसाठी बांधकाम केलेला गोठा गुरे विकून त्याचे छोटेखानी आर्ट गॅलरी म्युझियम बनवले. गेल्या अनेक वर्षांपासून विश्राम ठाकर आदिवासी कलाआंगण चॅरिटेबल ट्रस्ट नावाने नोंदणी करून त्यात पपेट, चित्रकथी, कळसूत्रीची अगदी शिस्तबद्ध मांडणी केलेली आहे.
म्युझियमच्या आजूबाजूच्या माड, पोफळींच्या झाडांच्या खोडावरसुद्धा राजे महाराजे द्वारपाल स्वागत करणा-या पुरातन स्त्रियांची चित्रे विविध रंगात रंगविलेली आहेत. आंगणात प्रवेश करायचे प्रवेशद्वार, कमानसुद्धा बांबूच्या डहाळ्यांपासून तयार करून त्यावर हरण, फुलेसारखी चित्र तर प्रवेशद्वाराच्या एका बाजूस हातात ढोलकी तर सोबतीला नंदीबैल असे सिमेंट प्लास्टरपासून बनवलेली प्रतिकृती त्यासमोरील छोट्याशा झोपडीत घरगडी त्याची शेतात राबणारी कारभारीण.
Padma Awards 2021: पद्म पुरस्कारांची घोषणा, जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंसह 7 जणांना पद्मविभूषण
कळसुत्री बाहुल्यांच्या माध्यमातून जनजागृती
परशुराम विश्राम गंगावणे हे गेल्या 45 वर्षांपासून आदिवासी ठाकर समाजाच्या पारंपारीक लोककला जतन व प्रसार करण्याचे काम करीत आहे. कठिण परिस्थितीमध्ये त्यांनी ही लोककला जपून ठेवली. ठाकर आदिवासी कला आंगण Museum & Art Gallery हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाहिले आदिवासी लोककला संग्रहालय आहे. हे म्युझियम त्यांनी गुरांच्या गोठ्यामध्ये सुरु केले. शिवाजी महाराजांच्या राजाश्रय लाभलेली ही कला काळाच्या ओघात नाहिसी झाली होती. ती कला जतन करण्याचे काम परशुराम गंगावणे यांनी केले. या संग्रहालयात सिंधुदुर्गचा ठाकर आदिवासी समाजाचा पारंपरिक लोककला कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी, चामड्याच्या बाहुल्या, पांगुळ बेल, डोना वाद्य, गोंधळ, पोथराज अशा लोककलेचं मांडणी केली आहे. गंगावणे यांनी विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बेटी बचाओ बेटी पढाओ, व्यसनमुक्ती , स्वच्छ भारत अभियान, एड्स अवेरनेस अशा अनेक विषयावर कळसुत्री बाहुल्यांच्या माध्यमातून कार्यक्रम केले आहेत.
Padma Awards 2021: अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना सामाजिक कार्यासाठी 'पद्मश्री' घोषित
काय आहे कळसूत्री बाहुल्याचा खेळ
कळसूत्री बाहुल्याचा खेळ कपड्याच्या मखरामध्ये दोन फूट मोकळा भागात केला जातो. तोच कळसूत्री बाहुल्यांचा रंगमंच. या रंगमंचाचे पडद्याने दोन भाग केले जातात. मागे सूत्रधार उभा राहतो. सूत्रधार बाहुल्यांचे दौर आपल्या बोटात अडकवून नाचवतो आणि कथाही सांगतो. दोन हातांनी चार बाहुल्या नाचवत असताना बोटांची कसब आणि कथा ऐकण्याची मजा काही वेगळीच असते.
ऐतिहासिक काळात ठाकर आदिवासी लोक कठपुतळी, पपेट, चित्रकथीसारख्या मनोरंजनातून प्रबोधनात्मक कार्य करत जवळ जवळ ११ कलांचे सादरीकरण ठाकर लोक करतात. इतिहास काळात असेच मनोरंजनाचे कार्यक्रम करताना चित्रकथी, पपेटवर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजांची मेहेरनजर पडली आणि या कलेला खरी ऊर्जितावस्था मिळून राजाश्रय लाभला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी कठपुतळी, कळसूत्री, पपेटचे सादरीकरण करण्यासाठी काही ठरावीक मंदिरात जागा उपलब्ध करून दिली. आणि रोजी-रोटीचा प्रश्नही सोडविला. त्याकाळी हातावर मोजण्याइतका आदिवासी ठाकर समाज होता. त्यामुळे प्रत्येकाला कुडाळ येथील केळबाई, साळगाव येथील वेताळ, झारापमधील भावई मंदिर अशी बरीच मंदिरे ठाकरांना आपली कला सादर करण्यासाठी दिली गेली. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत 14 व्या अध्यायात जो ‘वल्ली’ हा शब्द आहे तो ठाकर समाजाशी निगडित आहे. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गाव सोडल्यास महाराष्ट्रात ‘वल्ली’ कुठेही नाही.यावरून ही कला ज्ञानेश्वरांच्या कार्यकालात अस्तित्वात होती, याचे पुरावे मिळतात.
पद्मविभूषण पुरस्कार (7)
शिंजो आबे एस पी बालसुब्रमण्यम (मरणोत्तर) डॉ. बेले मोनप्पा नरेंद्र सिंह कॅम्पनी (मरणोत्तर) मौलाना वाहिद्दुद्दीन खान बी.बी लाल सुदर्शन साहू
पद्मभूषण (10) कृष्णन नायर शांताकुमारी चित्रा तरुण गोगोई (मरणोत्तर) चंद्रशेखर कांबरा सुमित्रा महाजन नृपेंद्र मिश्रा रामविलास पासवान (मरणोत्तर) केशूभाई पटेल (मरणोत्तर) कालबे सादिक (मरणोत्तर) रजनीकांत श्रॉफ (उद्योग) तारलोचन सिंह
महाराष्ट्रातून यांचा झाला सन्मान
पद्मभूषण रजनीकांत श्रॉफ (उद्योग)
पद्मश्री परशुराम गंगावणे (कला) नामदेव कांबळे (साहित्य आणि शिक्षण) जसवंतीबेन पोपट (उद्योग) गिरीश प्रभुणे (सामाजिक कार्य) सिंधूताई सपकाळ (सामाजिक कार्य)