एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
निघाले होते देवदर्शनाला, घडली जेलवारी
औरंगाबाद तालुक्यातील भाविकांना उस्मानाबाद पोलिसांच्या दडपशाहीमुळे नाहक नऊ दिवसांची जेलवारी भोगावी लागली आहे. केवळ पैसे देण्यास नकार दिल्यामुळे उस्मानाबादच्या वाहतूक पोलिसांनी कलम 353 चा गैरवापर करुन हा सगळा बनाव रचल्याची तक्रार भाविकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
उस्मानाबाद : देवदर्शनासाठी निघालेल्या औरंगाबाद तालुक्यातील भाविकांना उस्मानाबाद पोलिसांच्या दडपशाहीमुळे नाहक नऊ दिवसांची जेलवारी भोगावी लागली आहे. केवळ पैसे देण्यास नकार दिल्यामुळे उस्मानाबादच्या वाहतूक पोलिसांनी कलम 353 चा गैरवापर करुन हा सगळा बनाव रचल्याची तक्रार भाविकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तक्रारीची दखल घेवून उस्मानाबाद पोलिसांच्या भूमिकेची चौकशी करण्यासाठी दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील शंभराहून अधिक ज्येष्ठ नागरिक डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दोन धाम वारीसाठी निघाले होते. मध्यप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओदिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक अशी महिनाभर वारी चालली. 25 जानेवारीला भाविकांच्या दोन बस महाराष्ट्रात आल्या. सुरुवातीला कोल्हापूर नाक्यावर दोन हजारांचा दंड भरला.
मात्र उस्मानाबाद महामार्ग पोलिसांनी भाविकांच्या गाड्या पुन्हा अडवल्या. चार प्रवाशी आगाऊ असल्याचे निमित्त करुन पोलिसांनी चार हजार रुपयांची मागणी केली. एका प्रवाशाने थेट हरिभाऊ बागडेंना फोन लावला. यामुळे चिडलेल्या पोलिसांनी त्या भाविकाला बेदम मारहाण केली. काही प्रवाशांनी याचं मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं. मात्र चित्रीकरण सुरु असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी नरमाईचं सोंग घेतलं. मोबाईलमध्ये केलेले चित्रीकरण डिलिट करुन टाका, तुम्हाला सोडून देऊ, असा प्रस्ताव पोलिसांनी भाविकांसमोर ठेवला. विषय संपविण्याच्या अटीवर भाविकांनी तसं केलं.
मात्र पोलिसांनी जगन्नाथ काळे, पंढरीनाथ आदुडे आणि आशिष राजपूत यांच्यावर पोलिसांबरोबर वाद घालून पोलिसांना मारहाण केल्याचा गुन्हा नोंद केला. त्यामुळे या तीन भाविकांना विनाकारण कलम 353 च्या गुन्ह्यात नऊ दिवस जेलमध्ये घालवावी लागली. आज त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. मात्र हा सर्व प्रकार कन्नड तालु्क्यातील हतनूर येथील रहिवासी कैलास आकोलकर यांनी पत्राद्वारे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळविला आहे. या पत्राची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एक समिती करण्यात आली आहे.
उस्मानाबाद पोलिसांपेक्षा इंग्रज परवडले - भाविक
देशात आजवर अशा वाईट पध्दतीचा अनुभव कोणत्याच राज्यातील पोलिसांकडून आला नाही. उस्मानाबादच्या या वाहतूक पोलिसांपेक्षा इंग्रज परवडले, अशा शब्दात जामीनावर बाहेर आल्यानंतर जगन्नाथ काळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. उस्मानाबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड यांनी आमचे साधे म्हणणेही ऐकून घेतले नाही. थेट गुन्हा नोंदवून जेलमध्ये डांबले. त्यांच्या या अनपेक्षित वागणुकीमुळे 26 वर्षीय राजपूत यांना अश्रू अनावर झाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement