'उद्धव साहेब हा खेकडा सोलापूर धाराशिवची शिवसेना पोखरत आहे'; तानाजी सावंत यांचा खेकडा उल्लेख करत टीका
'उद्धव साहेब हा खेकडा सोलापूर धारशिवची शिवसेना पोखरत आहे, वेळीच नांग्या मोडा', असे बॅनर संपूर्ण शहरात लावण्यात आले आहेत.
सोलापूर : शिवसेनेमध्ये नाराज असलेले आमदार तानाजी सावंत यांची नाराजी संपायचं नाव घेत नाही. अशातच सोलापुरात तानाजी सावंत यांच्याविरोधात बॅनरबाजी होताना दिसत आहे. निष्ठावंत शिवसैनिक म्हणत अज्ञातांकडून तानाजी सावंत यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली असून तानाजी सावंत यांचा खेकडा असा उल्लेख करत टीका केली आहे. 'उद्धव साहेब हा खेकडा सोलापूर धारशिवची शिवसेना पोखरत आहे, वेळीच नांग्या मोडा', असे बॅनर संपूर्ण शहरात लावण्यात आले आहेत.
तानाजी सावंत यांचं नाराजी नाट्य अद्याप सुरू असून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या मराठवाड्याच्या बैठकीला नाराज आमदार तानाजी सावंत यांनी दांडी मारली आहे. आपला मतदारसंघ असलेल्या उस्मानाबाद संदर्भातील शासकीय बैठकीलाही तानाजी सावंत अनुपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसीय दौऱ्यावर मराठवाड्यातील जिल्हानिहाय अधिकऱ्यांसोबत बैठका लावल्या आहेत. मात्र काल जिल्हा परिषद निवडणुकीत बंडखोरी केल्यानंतर तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचना झुगारून बैठकीकडे पाठ फिरवली आहे.
दरम्यान, काल झालेल्या एक दिवसीय अधिवेशनाला तानाजी सावंत यांनी दांडी मारली होती. त्यांच्यासोबत उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले देखील नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र चौगुले यांनी तानाजी सावंत हे गैरहजर असल्याचे कारण माहीत नाही, वरिष्ठांना विचारा असं म्हणत सावंत यांच्या नाराजीवर बोलणं टाळलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उस्मानाबाद जिल्ह्याची महत्त्वाची आढावा बैठक आज औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली.
शिवसेनेचे माजी मंत्री असलेले तानाजी सावंत हे मंत्रिपद न मिळाल्याने नाराज आहेत. ते काल विशेष अधिवेशनाला देखील उपस्थित नव्हते. काल जिप अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तानाजी सावंत यांनी भाजपला साथ देत उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये आपल्या पुतण्याला उपाध्यक्ष केलं. तानाजी सावंत यांनी महाआघाडीच्या उमेदवारांसाठी मतदान करावं असा आदेश खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देऊनही तानाजी सावंतांनी तो ऐकला नाही. एवढेच नाही तर मातोश्री वरून आलेले फोनही घेतले नाहीत.
संबंधित बातम्या :
तानाजी सावंत यांची नाराजी मिटेना, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या मराठवाड्याच्या बैठकीलाही दांडी