Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नागपूर दौऱ्यावर, स्वागतासाठी भाजपकडून जय्यत तयारी
Amit Shah : अमित शाह यांच्या स्वागताचे पोस्टर्स संपूर्ण नागपूर शहरात लावण्यात आले आहेत. या दोऱ्यात ते अनेक सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावणार आहे
Amit Shah Visit Nagpur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. आज संध्याकाळी अमित शाह (Amit Shah) नागपुरात पोहोचणार असून तीन दिवसांचा महाराष्ट्र आणि वीस तासांच्या नागपूर दौऱ्यात अमित शाह अनेक सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावणार आहे
शहरभर झळकले हनुमानासोबतचे पोस्टर्स
अमित शाह यांच्या स्वागताचे पोस्टर्स संपूर्ण नागपूर शहरात लावण्यात आले आहेत. अमित शाह यांना भाजपचे संकटमोचक म्हणून पाहिले जाते. महाविकास आघाडीच्या हस्ते राज्याची सत्ता गमावून बसलेल्या भाजपला पुन्हा सत्तेच्या खुर्ची पर्यंत अमित शाह यांनीच आणले हे कोणापासूनही लपलेलं नाही. त्यामुळेच राजकारणातील संकटमोचक अशी ओळख असणाऱ्या अमित शाह यांचे संकटमोचक मानल्या जाणाऱ्या हनुमानासोबतचे पोस्टर्स नागपुरात ठीकठिकाणी लागले आहेत. अमित शाह यांच्या स्वागतासाठी भाजपने नागपुरात जय्यत तयारी केली आहे. सात वाजून पंचेचाळीस मिनिटांवर नागपुरात आल्यानंतर अमित शाह विमानतळाच्या व्हीआयपी गेट मधून बाहेर येतील. भाजपकडून विमानतळाच्या व्हीआयपी गेट जवळच एक व्यासपीठ उभारण्यात आले असून त्या ठिकाणी अमित शाह यांचे स्वागत केले जाणार असून अमित शाह निवडक कार्यकर्त्यांचं स्वागत स्वीकारणार आहेत. यावेळी अमित शाह कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक छोटं भाषणही करण्याची शक्यता आहे.
साडे आठच्या सुमारास अमित शाह फुटाळा तलावात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेलं लाईट आणि लेझर शो पाहण्यासाठी जाणार आहेत. यावेळी शाह यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही राहणार आहेत. देशाच्या राजकारणात नितीन गडकरी यांच्यासोबत अमित शाह यांचे फारसे सख्य नसले तरी लाईट आणि लेझर शोच्या माध्यमातून नितीन गडकरी शाह यांना नागपुरात करण्यात आलेल्या भरीव विकास कामांची झलक दाखवणार असल्याची चर्चा आहे. पुण्यात होऊ घातलेली पोटनिवडणूक आणि लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपने सुरू केलेल्या तयारीच्या दृष्टिकोनातूनही अमित शाह यांचा पुणे आणि कोल्हापूर दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नागपुरातून जगात पसरलेल्या दोन्ही प्रमुख विचारांना समसमान महत्व देताना दिसावे यासाठी भाजपने नागपुरात अमित शहा यांच्या दौऱ्याची आखणी विचारपूर्वक केली आहे.
'असा' असणार दौरा
उद्या अमित शाह सकाळी साडेदहा वाजता दीक्षाभूमीला जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन करणार आहेत. त्यानंतर रेशीम बाग परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात जाऊन संघाचे आद्य सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतीली.
अमित शाह यांच्या हेडगेवार स्मृती भवन परिसरातील भेटीच्या वेळेला सरसंघचालक मोहन भागवत किंवा संघाचे इतर वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित नसले तरी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे भाजपचे दोन्ही प्रमुख चेहरे त्यांच्यासोबत असणार आहेत. त्याशिवाय संघाचे विदर्भ प्रांत संघचालक आणि विदर्भ प्रांत सहसंघचालक यांच्यासह स्थानिक पदाधिकारी ही उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर अमित शहा लोकमत वृत्तपत्राच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि दुपारी पुण्याला रवाना होतील.
महत्वाच्या बातम्या