Vinayak Mete Death : वाहतूक नियम पाळा, रात्रीचा प्रवास नकोच हीच मेटेंना श्रद्धांजली! नितीन गडकरी, अजित पवार, उदयनराजेंकडून सल्ला
Vinayak Mete Death : विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उदनयराजे भोसले यांनी वडिलकीचा सल्ला दिला आहे.
Vinayak Mete Death : शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्या भीषण अपघाती मृत्यूनंतर पुन्हा एकदा वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. उमद्या नेत्याला अपघाती गमावल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उदनयराजे भोसले यांनी वडिलकीचा सल्ला दिला आहे. या तिन्ही नेत्यांनी निष्काळपणाने होत असलेल्या प्रवासावर बोट ठेवले.
नितीन गडकरी यांनी संपूर्ण भारताला अपघातमुक्त केलं पाहिजे हीच त्यांना मेटेंना खरी श्रद्धांजली असेल, अशी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मेटे यांचे अपघाती निधन अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मला या घटनेचे खूप दुःख होत आहे. माझे ते अत्यंत जवळचे मित्र होते. राज्यात विकासकामांमध्ये त्यांनी हिरारीने भाग घेतला. त्यांच्या अपघाती निधनाने राज्याला नुकसान झालं आहे. एक चांगला मित्र गमावला आहे.
रस्त्यावर अपघात होऊन लोक मृत्युमुखी पडतात. त्यामुळे सर्वांनी संवेदनशील नागरिक बनले पाहिजे. या अपघाताचा नेमकं कारण काय हे मला माहीत नाही. मात्र, आपण संपूर्ण भारताला अपघात मुक्त केले पाहिजे हीच विनायक मेटे यांना खरी श्रद्धांजली होईल असेही गडकरी म्हणाले.
रात्रभरच्या प्रवासाने डुलकी आली असावी, अजित पवारांची शंका
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी आज बोलावलेल्या बैठकीसाठी ते असताना रात्रभर प्रवासाने चालकाला डुलकी लागली असावी आणि त्यातून हे सगळं घडलं असावं. आम्ही राजकीय क्षेत्रात काम करणारे लोक किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील लोकांनी रात्रीचा प्रवास नेहमी टाळला पाहिजे, पण वेळ महत्त्वाची असते, त्यामुळे अनेकदा ते टाळणं शक्य होत नाही. कंटेनरचा वेग आणि कारचा वेग किती असतो हे आपल्या सगळ्यांना माहीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
उदयनराजे म्हणाले, वाहतूक नियम पाळले जात नाहीत
उदयनराजे भोसले यांनी एक्स्प्रेस वेवर होणाऱ्या चुक निर्दशनास आणून दिल्या. वाहतूक डिपार्टमेंटला सूचना करावी वाटते. वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. ट्रक कोणत्याही लेनमधून घुसतात. तिसऱ्या लेनमध्ये ट्रक चालकांना परवानगी असते. परंतु, हे ट्रकचालक दुसऱ्या आणि पहिल्या लेनमधून अवजड वाहने चालवतात. त्यामुळे अपघात होत असल्याचे ते म्हणाले. एक्स्प्रेस वेवर वाहतुकीच्या नियमांचे कठोर पालन झालं पाहिजे. ट्रकचालकांवर कारवाई करावी, पुन्हा असे प्रकार होणार नाहीत, अशी वाहतूक झाली पाहिजे. ठिकठिकाणी अॅम्बुलन्स, रेस्क्यू वाहने, पोलीस आदी उपलब्ध असावेत, असे उदयनराजे म्हणाले.