नव्या सरकारची शनिवारी बहुमत चाचणी, विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची होणार निवड
Maharashtra politics : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितले आहे. शनिवारी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष सत्र होणार आहे.
Maharashtra politics : महाराष्ट्रात शिंदेशाहीची सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात शपथविधी सोहळा संपन्न झाला. आता नव्या सरकारची बहुमत चाचणी येत्या शनिवारी होणार आहे. यावेळी विधानसभा अध्यक्षाची देखील निवड होणार आहे. विधानसभेचं विशेष अधिवेशन होणार आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितले आहे. शनिवारी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष सत्र होणार आहे. बहुमत चाचणीवेळी विधानसभा अध्यक्षांची देखील निवड होणाप आहे. महाराष्ट्र विधीमंडळाचे विशेष अधिवेशन 2 आणि ३ जुलै होणार आहे. अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. विधानसभा अध्यक्षपद भाजपकडे राहणार आहे.
बहुमत चाचणी म्हणजे काय?
बहुमत चाचणीद्वारे विद्यमान सरकारकडे बहुमताचा आकडा आहे की नाही हे ठरवलं जात. यासाठी विधानसभेचं विशेष सत्र बोलावलं जातं. निवडून आलेल्या सर्व आमदारांपैकी सभागृहात उपस्थित असलेले किती आमदार मतदान करतात, यावर बहुमत चाचणीचा निकाल ठरतो. कारण, मतदान करायचं की नाही, याचा निर्णय आमदार स्वतः घेऊ शकतात. जेवढ्या आमदारांनी मतदान केलं, त्याच निकषावर बहुमताचा आकडा ठरतो. राज्यपालांनी बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले असले तरी या प्रक्रियेत राज्यपालांचा हस्तक्षेप नसतो. बहुमत चाचणी ही पारदर्शक प्रक्रिया आहे. यासाठी आमदारांना व्यक्तिश: हजर राहावं लागलं. तसंच सर्वांसमोर मतदान करावं लागलं. बहुमत चाचणीसाठी आवाजी पद्धतीने, शीरगणतीने, हात उंचावून किंवा गुप्त पद्धतीने मतदान घेतलं जातं. मतदान कोणत्या पद्धतीने घ्यायचं हा निर्णय राज्यपालांचा असतो. दरम्यान आमदारांनी विधानसभेत उपस्थित राहण्यासाठी पक्ष व्हिप जारी करतो.
महाराष्ट्र विधानसभेत बहुमताचा आकडा काय?
राज्याच्या विधानसभेत 288 आमदार आहेत. त्यामुळे बहुमतासाठी 145 आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे. ज्या पक्षाकडे आकडे जास्त तो पक्ष सरकार स्थापन करु शकतो.
संबंधित बातम्या :