Sharad Pawar : साताऱ्याचा मुख्यमंत्री झाला यात आनंद, शिवसेनेत बंड करणारे सर्व पराभूत झालेत हा इतिहास: शरद पवार
Oath Ceremony : एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले ही साताऱ्याला लागलेली लॉटरी आहे असं शरद पवार म्हणाले.
मुंबई : एकनाथ शिंदे हे ठाण्याचे प्रतिनिधी असले तरी ते मूळचे साताऱ्याचे आहेत, ही सातारा जिल्ह्याला लागलेली लॉटरी आहे असं शरद पवार म्हणाले. शिवसेनेत या आधीही बंड झालं आहे, पण सर्व बंडखोर पराभूत झाले हा इतिहास आहे असंही शरद पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद हे आनंदाने स्वीकारलं नसल्याचं दिसतंय असंही ते म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्याचंही त्यांनी सांगितल.
शरद पवार म्हणाले की, "शिवसेनेत बंड झालं हे काही पहिल्यांदाच झालं नाही, जे लोक शिवसेनेतून बाहेर गेले, ते नंतर पराभूत झाले. छगन भुजबळ आणि नारायण राणे हे पराभूत झाले. माझ्या नेतृत्वाखाली निव़डणूक झाल्यानंतर 67 आमदार निवडून आले होते. मी काही दिवसांसाठी राज्याच्या बाहेर गेलो आणि सगळे सोडून गेले, फक्त सहा आमदार माझ्यासोबत राहिले. मग नंतरच्या निवडणुकीत सोडून गेलेले जवळपास सर्वजण पराभूत झाले. उद्धव ठाकरे हे सत्तेला चिकटून राहिले नाहीत हे योग्य झालं."
जे आमदार सेना सोडून गेले त्या बंडखोर आमदारांची नेतृत्व बदलाची मागणी असावी असं सांगत शरद पवार म्हणाले की, "कोणतीही संधी असो ती स्वीकारायची असते याचं उदाहरण देवेंद्र फडणवीसांनी घालून दिलं. शरद पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दोन नंबरची जागा त्यांनी आनंदाने स्वीकारली असं काही दिसत नाही, त्यांचा चेहराच सांगत होता. पण देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे, स्वयंसेवक संघाचे. त्यामुळे एकदा आदेश आल्यानंतर तो स्वीकारणे हे त्यांचे संस्कार आहेत. शिंदे मुख्यमंत्री होतील याची कुणालाच कल्पना नव्हती, त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची अपेक्षा होती. ते म्हणाले की, मी ज्यावेळी मुख्यमंत्री झालो त्यावेळी शंकरराव चव्हाण मंत्री होते, त्या आधी त्यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो. अशोक चव्हाण यांनीही मुख्यमंत्रीपदानंतर मंत्रीपद स्वीकारलं."
खरी शिवसेना कुणाची?
पक्ष हा वेगळ आहे आणि विधीमंडळ पक्ष हा वेगळा असतो. पक्ष हा मूळचा असतो, तो लोकांमध्ये काम करत असतो. तर निवडून आलेले लोक हे पाच वर्षांसाठी असतात. त्यामुळे पक्ष हा मूळच राहतो असं शरद पवार म्हणाले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर ते राज्याचे झाले, त्यांच्या पुढच्या कार्यासाठी मी त्यांना शुभेच्छा दिल्या असं शरद पवार म्हणाले.
एकनाथ शिंदे मूळचे साताऱ्याचे, याचा आनंद
शरद पवार म्हणाले की, "आता जे मुख्यमंत्री झाले ते ठाण्याचे प्रतिनिधी आहेत, पण ते मूळचे साताऱ्याचे आहेत. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे साताऱ्याचे माझंही मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याचा आहे. मी देखील राज्याचा मुख्यमंत्री झालो. बाबासाहेब भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली."
एकनाथ शिंदेंनी सेनेच्या आमदारांना प्रभावित केलं, जवळपास 40 आमदार बाहेर नेले, हेच त्यांचं मोठं यश आहे असं शरद पवार म्हणाले. आमदारांना बाहेर नेणं हे प्लॅनिंग आधीपासूनच होतं, ते काही एका दिवसात होणं शक्य नाही.
काँग्रेस राष्ट्रवादीमुळे सरकार गेलं असं सांगणं योग्य नाही, आता काहीतरी कारणं द्यावी लागतात म्हणून असं सांगितलं जातंय असं शरद पवार म्हणाले.
ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणेमुळे राज्यातील सत्ता बदलत आहेत. या एजन्सीचा उपयोग हा राजकीयदृष्ट्या वेगळ्या विचारांच्या लोकांविरोधात केला जातोय असं शरद पवार म्हणाले. आगामी निवडणुका या महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढायचं की नाही याचा विचार अद्याप झाला नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.