Sharad Pawar: संजय राऊत बोलले अन् महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरु झाली; आता शरद पवारांनी केला स्पष्ट खुलासा!
कोणत्याही जागेचा ठराव आणि त्याबद्दल चर्चा झालेली नाही, संजय राऊत यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायचा पूर्ण अधिकार आहे. आम्ही सामंजस्याने एकत्र बसू आणि पुढील दिशा ठरवू, असे पवार म्हणाले.
Sharad Pawar: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या सूचक विधानानंतर महाविकास आघाडीमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. अजून कोणत्याही जागेचा ठराव आणि त्याबद्दल चर्चा झालेली नाही, अशा स्पष्ट शब्दात खुलाासा केला. संजय राऊत यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायचा पूर्ण अधिकार आहे. आम्ही सामंजस्याने एकत्र बसू आणि पुढील दिशा ठरवू, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, अध्यक्ष शरद पवार यांनी उद्या (20 मे) कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यांनी स्वत: जाणार असल्याचे सांगतिले. त्यांचा मला फोन आला होता, मला शपथविधी कार्यक्रमासाठी बोलावलं आहे. मी उद्या कर्नाटकमध्ये शपथविधीसाठी हजर राहणार असल्याचे शरद पवार म्हणाले.
देशात एकत्र येऊन लोकांना पर्याय द्यावा लागेल
कर्नाटक निकालानंतर महाविकास आघाडीला आणखी बळकटी देण्यासाठी पुढाकार घेतलेल्या शरद पवार यांनी विरोधकांच्या ऐक्यावर भाष्य केले. ते यावेळी बोलताना म्हणाले की, आमचा प्रयत्न चालू आहे, लोकांना या देशात बदल हवा असल्याचा आमचा अभ्यास आहे. यासाठी देशातील सगळ्या पक्षांशी चर्चा करावी लागेल. देशात एकत्र येऊन लोकांना पर्याय द्यावा लागेल पुढील 3 ते 4 महिने आम्ही एकत्र येऊन चर्चा केली, तर हे नक्की होईल. ते पुढे म्हणाले की, नितीश कुमार यांची इच्छा आहे की आम्ही तिकडे जावं आणि या गोष्टीची तयारी करावी आणि चर्चा करावी. त्यासाठी आम्ही तारीख ठरवत आहे.
पवारांनी सांगितला नामांतराचा किस्सा
शरद पवार म्हणाले की, विद्यापीठ नामांतराचा निर्णय घेतला आणि तो राबवला, ज्या महामानवामुळे सत्ता मिळाली त्याच्या नावासाठी सत्ता गेली तरी त्याची फिकीर बाळगली नाही. मंडल आयोग असो किंवा लष्करात महिलांचा सहभाग असेल, निर्णय घेताना सत्ता जाईल याची चिंता केली नाही. असे निर्णय घेत असताना काही शक्ती आडवी येतात, त्यांच्याशी आपल्याला संघर्ष करायचा आहे उद्याचे भविष्य सांगणारे लोक आपली माणसं नसतात. हे लोक समाजाला अपेक्षित ठेवायचे काम करतात, अशा लोकांपासून आपल्याला सावध राहायचे असते. आज बाबासाहेब आंबेडकर, लहुजी वस्ताद, अण्णाभाऊ साठे यांचं नाव घेऊन तरुणाईला वेगळ्या दिशेला नेण्याचे काम वेगळी शक्ती करत आहे. आदिवासींना वनवासी ठरवून त्यांच्यातील स्वत्व उद्धस्त करण्याचे काम काही शक्ती करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
काय म्हणाले होते संजय राऊत?
दरम्यान, जागावाटपात ठाकरे गटाला किती जागा मिळतील? या प्रश्नावर संजय राऊतांनी सूचक विधान करताना म्हणाले की, आमचे लोकसभेत १९ खासदार राहतील. आम्ही त्या जिंकल्या आहेत त्या राहणारच. राष्ट्रवादीनं ४ जागा जिंकल्या आहेत. त्यावर कशी चर्चा होणार? काँग्रेसनं जरी चंद्रपूरची एक जागा जिंकली असली, तरी एक जागा त्यांच्याकडे राहणारच आहे. जिंकलेल्या जागा या जिंकलेल्या जागा असतात. त्या जिंकून आल्यानंतर कोण इकडे-तिकडे गेला त्यानं फरक पडत नाही. पण जागा शिवसेनेची आहे. महाराष्ट्रात 18 आणि दादरा-नगर हवेलीत एक खासदार निवडून आला आहे. असे19 खासदार आमचे आहेत. तो आमचा आकडा कायम राहील असे मी म्हणते आहे ती मागणी नाही.
इतर महत्वाच्या बातम्या