(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NCP Sharad Pawar: ठाकरेंचा धनुष्यबाण गेला...आता राष्ट्रवादीचं घड्याळ महाराष्ट्र, नागालँडपुरतंच
राष्ट्रवादीची स्थापना 1999 सालची. अवघ्या एका वर्षातच म्हणजे 2000 मध्येच राष्ट्रवादीला हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला होता. पण आता 23 वर्षानंतर तो हिरावला गेला आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगानं काढून घेतला आहे. 23 वर्षानंतर राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला. शरद पवारांची (Sharad Pawar) राष्ट्रवादी आता महाराष्ट्र आणि नागालँड या दोन राज्यांत स्टेट पार्टी म्हणून असणार आहे. 2014, 2019 च्या दोन लोकसभा निवडणुका आणि 2019 नंतर 21 पैकी 12 राज्यात जिथे राष्ट्रवादी लढली तिथल्या कामगिरीच्या आधारे निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे. तृणमूल काँग्रेस, माकप या दोन पक्षांसह राष्ट्रवादी हा तिसरा पक्ष ठरलाय, ज्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काल आयोगानं काढून घेतला आहे.
राष्ट्रवादीची स्थापना 1999 सालची. अवघ्या एका वर्षातच म्हणजे 2000 मध्येच राष्ट्रवादीला हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला होता. पण आता 23 वर्षानंतर तो हिरावला गेला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आयोगानं ठाकरेंकडून शिंदेच्या शिवसेनेला दिलं. आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानं पवारांचं घड्याळही महाराष्ट्र, नागालँडबाहेर चालणार नाही. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला महाराष्ट्राबाहेरच्या जागा धरुन एकूण सहा तर 2019 ला पाच खासदार निवडून आणता आलेत. आयोगाच्या निकषांमध्ये राष्ट्रीय पक्षासाठी आवश्यक पात्रता त्यांना इतर राज्यांमध्येही टिकवता आली नाही. निवडणूक आयोगाच्या सुनावणीत राष्ट्रवादीचं म्हणणं होतं की 2024 पर्यंत वाट पाहा. त्या निवडणुकीत कामगिरी सुधारायची आम्हाला संधी द्या.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला म्हणजे काय काय गेलं?
- राष्ट्रवादीला त्यांचं घड्याळ हे चिन्ह आता केवळ महाराष्ट्र, नागालँड या दोन राज्यांत कायम ठेवता येईल
- इतर राज्यांत कुणी हे चिन्ह मागितलं तर निवडणूक आयोग ते तात्पुरतं देऊ शकतं
- राष्ट्रीय पक्षाला राजधानी दिल्लीत पक्ष कार्यालयासाठी जागा मिळते ती राष्ट्रवादीला आता मिळणार नाही
- निवडणुकीत सरकारी वाहिन्यांवर प्रचारासाठी राखीव असलेला वेळ आता राष्ट्रवादीला मिळणार नाही
राष्ट्रीय दर्जा परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादीला हे तीन पर्याय?
- लोकसभा निवडणुकीत किमान 2 टक्के म्हणजे 11 जागा जिंकाव्या लागतील आणि किमान 3 राज्यांमध्ये उमेदवारही उभे करावे लागेल
- लोकसभा निवडणुकीत किमान 4 खासदार असतील आणि सोबत देशाच्या 4 राज्यांमध्ये विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत किमान 6 टक्के मतं मिळवून दाखवावी लागतील
- तिसरा पर्याय म्हणजे लोकसभा निवडणुकीतल्या आकड्यात न पडता, देशाच्या किमान 4 राज्यांमध्ये स्टेट पार्टी हा दर्जा टिकवावा लागेल. सध्या महाराष्ट्र, नागालँड या दोन राज्यांत राष्ट्रवादीला हा दर्जा आहे. त्यांना अजून दोन राज्यांत त्यासाठी कामगिरी सुधारावी लागेल
एकीकडे तृणमूल, राष्ट्रवादी, भाकप या तीन पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हिरावला गेलाय. तर दुसरीकडे केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मात्र तो मिळाला आहे. लोकसभेत आपचा एकही खासदार नाहीत पण दिल्ली, पंजाब, गोवा , गुजरात या राज्यांत आपनं राज्य पक्षाचा दर्जा मिळवला आहे. यातल्या दिल्ली, पंजाबमध्ये तर त्यांचे मुख्यमंत्री आहेत.
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आता अवघं एक वर्ष उरलं आहे. त्याचवेळी या तीन प्रमुख पक्षांचा हा दर्जा हिरावला गेलाय. यातल्या दोन पक्षांचे नेते ममता बॅनर्जी, शरद पवार हे तर पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणूनही विरोधी गटात पाहिले जातात.
राष्ट्रीय राजकारणात आपलं स्थान भक्कम करण्यासाठी आता पुन्हा या पक्षांना आपली ताकद दाखवावी लागेल.