(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला, जाणून घ्या काय होणार नुकसान!
NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्याने त्यांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मिळणारे फायदे गमवावे लागणार आहेत. जाणून घ्या काय होणार परिणाम...
NCP Sharad Pawar : आज केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) आज मोठा निर्णय घेतला. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आता प्रादेशिक पक्ष असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांनादेखील आपला राष्ट्रीय पक्षांचा दर्जा गमवावा लागला आहे. तर, दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पक्षाला निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला आता काही अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्ष म्हणून मिळणाऱ्या सवलती आता गमवाव्या लागणार आहेत.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर राजकीय पक्षांसाठी काही गोष्टी फायदेशीर ठरतात.
> राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर पक्षाचे निवडणूक चिन्ह संपूर्ण देशभरात कायम राहते. या निवडणूक चिन्हावर इतर दावा करू शकत नाहीत. आता राष्ट्रवादीचे हे निवडणूक चिन्ह घड्याळ राखीव नसणार
> राष्ट्रीय पक्षाच्या दर्जामुळे राष्ट्रवादीला निवडणूक प्रचारात अधिकाधिक 40 स्टार प्रचारक नेमता येत होते. या प्रचारकांचा खर्च उमेदवारांसाठीच्या खर्चातून न होता पक्षाच्या खात्यातून केला जात होता. आता, त्यावरही बंधने येणार ाहेत.
> सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यकाळात दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवर पक्षाच्या प्रचारासाठी वेळ मिळत होता. राष्ट्रवादीला आता ही संधी मिळणार नाही.
> राष्ट्रीय पक्ष घोषित झाल्यावर पक्षाचे मुख्यालय बांधण्यासाठी सवलतीच्या दरात सरकारी जमीन मिळते. राष्ट्रवादीने आता ही सवलत गमवली आहे.
> राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाकडून निवडणूक मतदार याद्या मोफत मिळत होत्या. आता या मतदार याद्या मोफत मिळणार नाहीत.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कोणत्या आधारावर?
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी राजकीय पक्षांकडे किमान तीन राज्यात लोकसभेच्या 2 टक्के जागा असायला हव्यात, म्हणजेच लोकसभेच्या 11 जागा असाव्यात. एखाद्या राजकीय पक्षाला चार राज्यात प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यास त्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो. प्रादेशिक पक्ष, राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी राज्याच्या विधानसभा निवडणुकीत किमान सहा टक्के मते अथवा दोन जागा निवडून आणणे आवश्यक आहे. जर सहा टक्क्यांहून कमी मते असतील तर किमान तीन सदस्य विधानसभा निवडणुकीत विजयी होणे आवश्यक आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: