(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amol Kolhe on Onion : कांद्याला प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे दर ही गोष्ट शेतकऱ्यांवर अन्याय करणारी, अमोल कोल्हेंचं नाफेडच्या अधिकाऱ्याला पत्र
राज्यात नाफेडकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी सुरु आहे. मात्र, तो कांदा कमी दराने खरेदी केला जात आहे. यावरुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नाफेडच्या अधिकाऱ्याला पत्र लिहले आहे.
MP Amol Kolhe on Onion : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण कांद्याला बाजारपेठेत खूप कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघणे कठीण झाले आहे. सध्या राज्यात नाफेडकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी सुरु आहे. मात्र, नाफेडकडून कांदा कमी दराने खरेदी केला जात आहे. तसेच कांदा खरेदीसाठी जिल्हानिहाय वेगवेगळे दर दिले जात आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या प्रकरणाची राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी चांगलीच दखल घेतली आहे. अमोल कोल्हे यांनी कांदा खरेदीबीबत नाफेडच्या पिंपळगाव बसवंत युनिटचे प्रमुख शेलेंद्र कुमार यांना पत्र लिहिले आहे.
अमोल कोल्हेंनी नेमकं काय म्हटलंय पत्रात?
महाराष्ट्रातील कांदा खरेदी नाफेडमार्फत केली जाते. कांद्याचे दर ठरवण्याचे कामही नाफेडच करते. परंतु नाफेडकडून कांदा खरेदीसाठी दिले जाणारे प्रतिक्विंटलचे दर जिल्हानिहाय वेगवेगळे असतात. यामुळे एकाच वेळी राज्याच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे व खूप मोठी तफावत असलेले दर पहायला मिळत आहेत. ही गोष्ट कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून हे धोरण बदलण्याची मागणी होत आहे. त्या अनुषंगाने नाफेडच्या पिंपळगाव बसवंत युनिटचे प्रमुख शेलेंद्र कुमार यांना पत्र लिहिले आहे. नाफेडमार्फत कांदा खरेदी करताना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकसमान दर मिळावा यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती कोल्हे यांनी केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे दर ही गोष्ट कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असल्याचे कोल्हेंनी म्हटले आहे.
नाफेडबाबत तक्रारी
कांद्याचे अतिरिक्त उत्पादन झाल्यामुळे कांद्याचे कोसळणारे दर सावरण्यासाठी शासनाने नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरु केली आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या कांदा खरेदीबाबत अतिशय गोपनीयता पाळली जात असून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरु असल्याच्या तक्रारी येत आहेत. नाफेडमार्फत सुरु असलेल्या कांदा खरदीची चौकशी करुन दोषी संस्था व अधिकार्यांवर तातडीने कारवाई करावी. तसेच योग्य प्रकारे कांदा खरेदी सुरु ठेवावी, अशी मागणी देखील काही शेतकरी संघटनांकडून होत आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही कांद्याचे अतिरिक्त उत्पादन झाल्यामुळे कांद्याचे दर कोसळले आहेत. कांद्याचे दर सावरण्यासाठी शासनाने, मुल्य स्थिरिकरण निधी अंतर्गत काही जिल्ह्यांमध्ये कांदा खरेदी सुरु केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात खरेदीचे दर वेगवेगळे आहेत.
महत्वाच्या बातम्या: