(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhagan Bhujbal : इतकी संपत्ती कुठून आणली? भुजबळांनी म्हटलं पहाटे तीन वाजल्यापासून भाज्या विकायचो
Chhagan Bhujbal : पहाटे 3 वाजल्यापासून आम्ही भाज्या विकायचो. हळूहळू भाज्या कंपन्यांना विकण्याचं कंत्राट घेतलं होतं. आम्ही हळूहळू कंपन्या सुरू केल्या आणि त्यानंतर पैसा उभा राहिला.
Chhagan Bhujbal : लोकं म्हणतात यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली. त्यांना सांगायचं आहे की, पहाटे 3 वाजल्यापासून आम्ही भाज्या विकायचो. हळूहळू भाज्या कंपन्यांना विकण्याचं कंत्राट घेतलं होतं. आम्ही हळूहळू कंपन्या सुरू केल्या आणि त्यानंतर पैसा उभा राहिला, असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितलं. त्यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी छगन भुजबळ बोलत होते. या कार्यक्रमाला शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, पारुख अब्दुला यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी त्यांच्या संघर्षाचा प्रवास सांगितला.
देशात सध्या दाढीवाल्यांचे राज्य -
माझी एकसष्टी शिवाजी पार्कमध्ये साजरी झाली होती, तेव्हा शरद पवार तर होतेच, तेव्हा फारुख अब्दुला यांनीही त्यावेळी आशिर्वाद दिले होते. आपण सर्वजणही आला असाल. पण त्यावेळी आलेल्या दोन व्यक्ती आज नाहीत. त्यामध्ये गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख आज नाहीत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आमंत्रित केलं होतं, पण व्यस्त कार्यक्रमामुळे ते आले नसतील. पण त्यांच्या शुभेच्छा असतील असं गृहित धरतो.
दाढी का ठेवता?
एबीपी माझाच्या कट्ट्यावर तुमचं वय झालं नाही, मग दाढी का ठेवता असा प्रश्न विचारला होता.. त्यावर मी त्यांना म्हटले.., देशात महाराष्ट्रामध्ये दाढीवाल्याचं राज्य आहे. कुठे काळी दाढी आहे कुठे पांढरी दाढी आहे. त्यामुळे मी दाढी ठेवली.
विद्यार्थी ते शिवसेनाचा पहिला शाखाप्रमुख -
75 वर्षांचा चित्रपट जेव्हा डोळ्यासमोरुन जातो, तेव्हा विचार करतो... आपण कुठे होतो काय झालो असा विचार केला जातो. त्यावेळी असं लक्षात आलं. जेव्हा आपल्याला काही कळत नव्हतं तेव्हा आई आणि वडिल दोघेही गेले. आईच्या मावशीनं माझगावमध्ये माझं आणि भावाचं संगोपण केलं. दहा बाय बाराच्या खोलीत आम्ही लहानाचं मोठं झालो. बीएमसीमधील शिक्षकांनी माझ्यावर प्रेम केलं. पुस्तकं वह्या ते द्यायचे. सहलीलाही ते घेऊन जायचे. माझ्यावर सर्व संस्कार त्यांनीच केले. भाषण कसं करायचं हे मी तेव्हाच शिकलो. त्यानंतर एलफिस्टनमध्ये शिकलो.... त्यानंतर नेव्हीमध्ये शिकलो... चांगले मार्क मिळाले होते. त्यानंतर व्हीजेटीआय कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला... तिथेही पहिलेच पारितोषिक मिळाले... हे सर्व करत असताना बाळासाहेब ठाकरे यांची शिवाजी पार्कमध्ये सभा झाली. त्यावेळी मी कॉलेजमध्ये सेक्रेटरी होते... मराठी माणसाला नोकऱ्या मिळायला हव्या, असे विद्यार्थी म्हणाले. त्यामुळे आम्ही शिवाजी पार्कमध्ये गेलो. त्या सभेला प्रबोधनकार ठाकरे होते, दत्ताजी साळवे होते, बाळासाहेब ठाकरे होते. त्यावेळी आम्हाला पटलं, जायला हवं. त्यानंतर माझगावमध्ये आलो, तेव्हा मला शाखाप्रमुख व्हायला हवं असं सांगण्यात आलं. पहिल्या 10 - 12 शाखाप्रमुखांमधील मी एक होय, अशी आठवण छगन भुजबळ यांनी सांगितली.
पहिली निवडणूक -
शिवसेनंच काम सुरु झालं. मराठी माणसासाठी लढणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठिसी आम्ही उभं राहिलो. घोषणाबाजी केली. रात्री तीन तीन वाजेपर्यंत घोषणा चुन्यानं लिहायचो. हे करत असातानाच 1973 मध्ये छगन भुजबळ यांना निवडून द्या असे म्हणत प्रचार केला. एक रुपयाही खर्च न करता मी निवडणूक जिंकली होती. लोकांनी निवडून दिले.
इतकी संपत्ती कुठून आणली?
माझ्या मोठ्या भावाने खूप कष्ट केले. भाजी आणून माझगावच्या फूटपाथवर आम्ही विकायचो. खूप काही सहन केले, हळू हळू धंदा वाढत राहिला.. भाऊ तीन वाजता जायचा, मी पाच वाजता जायचो. त्यानंतर मोठ्या मोठ्या कंपन्याचे कँट्रॅक्ट मिळायला लागले. ट्रक भरुन भाजी पाठवू लागलो. खूप कष्ट केले अन् लोक म्हणतात, येवढी संपत्ती कुठून आणली..
शरद पवार यांचे काही सांगता येत नाही-
मला मनोहर जोशी यांनी एमसीए निवडणूक लढवायचे सांगितली, अर्ज दाखल केला आणि जोशी गायब झाले. मतदान दिवशी मनोहर जोशी पवार साहेब समवेत होते. शरद पवार यांच्या विरोधात उभे राहिलो, जे मनोहर जोशी यांनी मला पवार यांच्या विरोधात उभे केले तेच जोशी हे पवार यांच्या सोबत होते..पवार यांचे काही सांगता येत नाही, असे छगन भुजबळ यांनी सांगितलं.