Eknath khadse on Girish Mahajan : गिरीश महाजन बालिश; एकनाथ खडसेंचा पलटवार
Eknath khadse on Girish Mahajan : गिरीश महाजनांना मीच राजकारणात आणलं. पहिल्यांदा त्यांना मीच आमदार म्हणून निवडून आणलं. ते बालिश आहेत, असं म्हणत एकनाथ खडसेंनी निशाणा साधला आहे.
Eknath khadse on Girish Mahajan : गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि एकनाथ खडसे (Eknath khadse) यांच्यातील शाब्दिक खडाजंगी आपल्या सर्वांच्या परिचयाचीच. काही दिवसांपूर्वी गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला होता. खडसेंची अवस्था म्हणजे, मंदिरात गेले अन् प्रसाद संपला तर बाहेर आले अन् चप्पल चोरीला गेली अशी झालीय, असा निशाणा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर साधला आहे. भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्या टीकेला एकनाथ खडसे यांनी खोचक शब्दांत उत्तर दिलं आहे. गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेबाबत खडसेंना विचारल्यावर त्यांनी गिरीश महाजन बालिश आहेत, असं म्हणत टोला लगावला आहे.
राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार एकनाथ खडसे यांनी सपत्नीक पंढरपूरमध्ये जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं. त्यावेळी गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, "गिरीश महाजनांना मीच राजकारणात आणलं. पहिल्यांदा त्यांना मीच आमदार म्हणून निवडून आणलं. ते बालिश आहेत." एकनाथ खडसे पंढरपुरात दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी एबीपी माझाशी बातचित केली.
काय म्हणाले होते गिरीश महाजन?
एकनाथ खडसेंची विधानपरिषदेवर निवड होणं आणि राज्यात सत्तांतर होण्याच्या टायमिंगवरुन गिरीश महाजनांनी निशाणा साधला आहे. "खडसेंची अवस्था म्हणजे मंदिरात गेले अन् प्रसाद संपला, तर बाहेर आले अन् चप्पल चोरीला गेली अशी झाली आहे.", अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवप टीका केली होती. तसेच, एकनाथ खडसे हे भाजपमध्ये असताना त्यांचं बरं होतं. मात्र ते राष्ट्रवादीत गेल्यापासून मंदिरात गेल्यानंतर चप्पल विसरली आणि पंगतीत जेवायला बसल्यानंतर बुंदी संपली अशी अवस्था खडसेंची झाली असल्याची, टीका भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी केली होती.
दरम्यान, एकनाथ खडसेंनी काही दिवसांपूर्वी भाजपची साथ सोडत, राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं होतं. एकनाथ खडसेंनी पक्ष सोडताना देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांवर आरोप केले होते. तसेच, पक्ष सोडताना खडसेंनी भाजप नेत्यांना खुलं आव्हानंही दिलं होतं. तुम्ही ईडी लावली तर, मी सीडी लावीन, असं म्हणत खडसेंनी खुलं आव्हान दिलं होतं.