Shirdi Assembly Constituency : राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
Shirdi Assembly Constituency : राहुल गांधी यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघात एकाच इमारतीत 7 हजार मतदार वाढवल्याचा आरोप केल्याने राजकारण तापले आहे. या आरोपावर आता राहाता प्रशासनाने खुलासा केलाय.

शिर्डी : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी देशभरात मोठ्या संख्येने मतदार नोंदणी करण्यात आली असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघात (Shirdi Assembly Constituency) एकाच इमारतीत 7 हजार मतदार वाढवल्याचा आरोप केल्याने राजकारण तापले आहे. राहुल गांधी यांनी कुठलंही विधान करताना भान ठेवायला हवं, असा पलटवार राज्याचे मंत्री आणि शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय.
तर राहता विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अमोल मोरे यांनी मात्र याबाबत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर केला असून अशी कुठलीही इमारत नाही, की ज्या ठिकाणी 7000 मतदार एकाच वेळी वाढले असल्याच स्पष्ट करताना मतदार नोंदणी करताना कुठल्याही नियमाचा भंग झाला नसल्याचे स्पष्ट केलंय.
एकाच इमारती मध्ये तब्बल सात हजार मतदार वाढले- प्रभावती घोगरे
शिर्डी विधानसभा मतदारसंघात यावेळी मोठ्या प्रमाणात नवमतदारांची नोंदणी केली गेली आणि हे सर्व मतदार बोगस असल्याचा आरोप विखे पाटलांच्या विरोधात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांनी केला होता. विधानसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी प्रभावती घोगरे यांनी अनेक व्हिडिओ देखील समाज माध्यमातून व्हायरल केले होते. त्या अनुषंगाने आता राहुल गांधींनीही राज्यात मतदार वाढल्या आरोप केला असून शिर्डी मतदारसंघात एकाच इमारती मध्ये तब्बल सात हजार मतदार वाढले असा गंभीर आरोप संसदेत केलाय.
शिर्डी मतदारसंघातील लोणी येथील मेडिकल कॉलेज, इंजीनियरिंग कॉलेज आणि सर्वच कॉलेजचे मुले मतदान करत होते. माझा असा आरोप आहे कि 7000च नव्हे तर त्यापेक्षाही जास्त मतदारांनी मतदान केले आहे, हे सर्व मॅनेज केलं असल्याचा आरोप प्रभावती घोगरे यांनी पुन्हा एकदा केलाय.
राहुल गांधींनी हा शोध कुठून लावलाय त्याचा शोध आता मी घेत असून कोणतही विधान करण्यापूर्वी त्यांनी भान ठेवायला हवं. भाजपाला मिळालेला जनादेश याचं दुःख विरोधी पक्षाला असून ज्यांनी जनाधार गमावलाय ते आता अशा प्रकारे जनतेसमोर येण्याचा प्रयत्न करत असल्याचा पलटवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय...
यात कुठल्याही नियमाचा भंग नाही- तहसीलदार अमोल मोरे
दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपात कुठलंही तथ्य नसून नवमतदार नोंदणी ही नियमाप्रमाणेच केली गेली आहे. त्यात अस्थायी असणारे विद्यार्थ्यांना प्राचार्य आणि होस्टल रेक्टरच्या दाखल्यानंतर मतदार ओळखपत्र देण्यात येतात. आणि एका इमारतीत राहणारांची इतक्या मोठ्या प्रमाणात नोंद केली गेली हा आरोप चुकीचा असून यात कुठल्याही नियमाचा भंग नाही. अगोदरही हा आरोप झाला होता. तेव्हाच आम्ही अहवाल निवडणूक आयोगाला पाठवला असल्याचं शिर्डीचे निवडणूक अधिकारी अमोल मोरे यांनी म्हणटलंय.
विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर अनेकदा बोगस मतदार नोंद केल्याचे आरोप विरोधकांनी केले. त्यात आता राहुल गांधी यांनी लोकसभेतच हा प्रश्न उपस्थित केल्याने पुन्हा एकदा बोगस मतदार नोंदणीची चर्चा सुरू झाली आहे हे मात्र नक्की.
इतर महत्वाच्या बातम्या
























