एक्स्प्लोर
राष्ट्रवादीचा बीडमधील झेडपी सदस्यांना व्हीप
बीड : माजी मंत्री सुरेश धस यांच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने बीड जिल्हा परिषद सदस्यांसाठी व्हीप जारी केला आहे. पक्षविरोधी मतदान केल्यास कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा राष्ट्रवादीने सदस्यांना दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुरेश धस यांची विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्याविषयी असलेली नाराजी पक्षाला चांगलीच महागात पडण्याची शक्यता आहे. कारण सुरेश धस यांनी आपले पाच सदस्य भाजपला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केल्याची माहिती आहे.
सुरेश धस यांची नाराजी का?
बीड जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडित यांनाच पक्षाकडून बळ दिलं जात असल्याचा धस यांचा आरोप आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आणण्यात धस यांचाही मोठा वाटा आहे. धनंजय मुंडे यांचं नेतृत्व सुरेश धस यांना मान्य नसल्याचं बोललं जात. त्यामुळेच त्यांनी धनंजय मुंडे यांना आव्हान दिल्याची चर्चा आहे.
भारतभूषण यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा रात्री उशीरा दिल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीने बीड पंचायत समितीमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या नावे व्हीप बजावून क्षीरसागरांना घरातूनच आव्हान निर्माण केलं होतं. याचाच राग म्हणून भारतभूषण यांनी राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे.
कुणाचं संख्याबळ किती?
सुरेश धस यांचे समर्थक 5-7 सदस्य भाजपला पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे एकूण 24 सदस्य निवडून आले आहेत. मात्र काँग्रेसचे 2 सदस्य राष्ट्रवादीला पाठिंबा देऊ शकतात. तर काँग्रेसच्या निवडून आलेल्या एकूण 3 सदस्यांपैकी 1 सदस्य भाजपच्या गळाला लागल्याची माहिती आहे.
भाजपचे एकूण 19 आणि एक भाजप पुरस्कृत असं 20 एवढं संख्याबळ आहे. सुरेश धस यांचे 7, काँग्रेस 1 आणि शिवसंग्रामच्या चार सदस्यांचाही भाजपला पाठिंबा असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपचं संख्याबळ 32 च्या आसपास असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यात पाठिंब्याबाबत सकारात्मक चर्चा घडवून आणली होती, असं बोललं जातं.
दरम्यान बीड जिल्ह्यात भाजपसाठी नेहमी आव्हान असणाऱ्या राष्ट्रवादीमध्ये यानिमित्ताने मोठी दुफळी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जागा कमी असताना जिल्हा परिषदेवर झेंडा फडकावण्याचं आव्हान बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर असेल.
बीड जिल्हा परिषद पक्षीय बलाबल – एकूण जागा- 60
- राष्ट्रवादी- 25
- भाजपा- 19
- काँग्रेस- 03
- शिवसंग्राम- 04
- शिवसेना- 04
- काकू-नाना आघाडी- 03
- गोपीनाथ मुंडे आघाडी- 01 (भाजपा पुरस्कृत)
- अपक्ष- 01 ( राष्ट्रवादी पुरस्कृत)
संबंधित बातमी : बीडमध्ये राष्ट्रवादीला 'धस'का, 7 सदस्यांचा भाजपला पाठिंबा?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement