Pune NCP : भाजपच्या दोन विधानसभा जागांवर एनसीपीचा दावा, अजितदादांची सुद्धा संमती? महायुतीत तिढा वाढणार!
Pune NCP : भोसरीच्या जागेवर पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि चिंचवडच्या जागेवर नाना काटे यांनी दावा ठोकला आहे.
राष्ट्रवादीच्या 25व्या वर्धापन दिनी मेळाव्यात छगन भुजबळ यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाला मिळतील, तितक्याच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागा मिळाव्यात, अशी मागणी केल्यानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. आता भाजपच्या दोन जागांवर राष्ट्रवादीने थेट हक्क दाखवला आहे. अजित पवारांची सुद्धा याला संमती असणार, असा दावाही इच्छुक उमेदवारांनी केला आहे. त्यामुळं महायुतीत तिढा वाढण्याची दाट शक्यता आहे.
पुण्यातील भोसरीत भाजपचे महेश लांडगे, तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आमदार आहेत. असं असताना भोसरीच्या जागेवर पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि चिंचवडच्या जागेवर नाना काटे यांनी दावा ठोकला आहे. गव्हाणे आणि काटे यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी अजित पवारांकडे तशी मागणी केली असून दादांची याला संमती असणार, असा दावाही या दोघांनी केला आहे.
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे काय म्हणाले?
दरम्यान, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले की, भोसरी हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ आहे. विलास लांडे पाटील यांनी दोनवेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केलं आहे. आमच्या पक्षाची ताकद अत्यंत चांगली आहे. त्यामुळे स्वत: मी इच्छूक आहे, त्यामुळे आम्हाला ही जागा मिळावी, अशी आशा असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, भाजपचा आमदार असला, तरी दावा केल्याने तिढा निर्माण होईल असे वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले. मतदारसंघात भूमिका जाणून घेतली जाईल, सर्व्हेही होईल असे त्यांनी सांगितले. हा विषय अजितदादांच्या कानावर घातला असल्याचे त्यांनी सांगितले.
नाना काटे काय म्हणाले?
चिंचवडच्या जागेवर दावा ठोकलेल्या नाना काटे यांनीही चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सोबत असल्याचे सांगितले. जो काही विकास झाला आहे तो विकास अजितदादांच्या माध्यमातून झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी भक्कम असल्याचे ते म्हणाले. सर्व कार्यकर्ते सोबत राहतील, असेही त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या