Arvind Kejriwal Sharad Pawar: राज्यसभेत अध्यादेशाविरोधात विरोधकांनी मतदान करावं; पवारांच्या भेटीनंतर केजरीवालांचे आवाहन
Arvind Kejriwal Sharad Pawar: केंद्र सरकारने काढलेला अध्यादेश हा फक्त दिल्ली सरकारविरोधात नसून देशाविरोधात असल्याचे प्रतिपादन केजरीवाल यांनी केले. तर, शरद पवार यांनी आपच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
Arvind Kejriwal Sharad Pawar: केंद्र सरकार आणलेला अध्यादेश हा फक्त दिल्लीतील लोकांविरोधात नाही. तर, देशाच्या संघराज्य प्रणालीवर केलेला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या घटनाविरोधी अध्यादेशाविरोधात राज्यसभेत विरोधकांनी मतदान करावे असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत आवाहन केले. यावेळी आम्ही केजरीवाल यांच्या पाठीशी असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.
सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला त्यांच्या अखत्यारीत असलेल्या खात्यांच्या अधिकाऱ्यांची बदली करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले होते. सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिल्यानंतर काही दिवसातच केंद्र सरकारने दिल्ली सरकारचे अधिकाऱ्यांच्या बदलीचे अधिकार गोठवणारा अध्यादेश जारी केला. त्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने केजरीवाल मागील दोन दिवस मुंबईत आहेत. बुधवारी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तर, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
'आप'कडून केजरीवाल यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, खासदार संजय सिंह, राघव चढ्ढा उपस्थित होते. तर, राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते.
शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेला संबोधित केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, दिल्लीच्या लोकांवर अन्याय सुरू झाला आहे. केंद्र सरकारकडून दिल्ली सरकारच्या अधिकारांवर हल्ला करण्यात येत आहे. एका अध्यादेशाद्वारे केंद्राकडून अधिकाऱ्यांच्या बदल्याचे अधिकार हिरावले. राज्यसभेत आम्ही विधेयक मंजूर होऊ देणार नाही. हा फक्त दिल्लीचा मुद्दा नाही, तर संघराज्याचा मुद्दा असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले.
भाजप विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यासोबत दुजाभाव करत आहे. ईडी आणि तपास यंत्रणांची भीती दाखवली जाते. अटक केली जाते. त्यालादेखील एखादा पक्ष जुमानला नाही तर आमदार फोडले जातात आणि भाजप सरकार स्थापन करते. महाराष्ट्रात हेच दिसून आले असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. त्यानंतरही राज्य सरकार झुकले नाही तर अध्यादेश काढले जातात. दिल्लीचा मुद्दा नाही हा सगळ्या देशाचा मुद्दा आहे. शरद पवार हे देशातील उत्तुंग नेते आहेत. त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले. राज्यसभेत या अध्यादेशाबाबतचे विधेयक नामंजूर झाल्यास 2024 चे चित्र दिसून येईल, असेही केजरीवाल यांनी म्हटले. आपला देश मोठी लोकशाही असलेला देश आहे. पण देशात लोकशाहीला मूल्य पायदळी तुडवले जात असल्याची टीका भगवंत मान यांनी केली.
शरद पवारांचा पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दिला. देशात सध्या भाजपकडून लोकशाहीवर आघात सुरु आहेत. ही समस्या फक्त दिल्लीची नाही तर संपूर्ण देशाची आहे. त्यामुळं आम्ही केजरीवाल यांच्या पाठीशी आहोत असे पवार यांनी म्हटले. देशात सध्या भाजपकडून लोकशाहीवर आघात सुरू असल्याचे पवार यांनी म्हटले.