Navratri 2022 : कोरोनाच्या दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त शारदीय नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात
यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होत असल्याने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्सवामुळे मंदिर परिसरातील दुकाने गजबजून गेले असून फुल, प्रसाद साहित्याने फुलली आहेत.
मुंबई : शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या आदिशक्तीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला (Navratri 2022) आजपासून सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होत असलेल्या नवरात्रोत्सवाने राज्यासह देशभरात चैतन्याचे वातावरण आहे. नवरात्रोत्सवानिमित्त राज्यातील शक्तीपीठं गजबजली आहेत. साडेतीन शक्तीपीठं असलेल्या देवस्थानांमध्ये नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहुरची रेणुकामाता आणि नाशिकच्या वणीची सप्तश्रुंगी देवीचं मंदिर नवरात्रोत्सवानिमित्त सजलंय.
यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होत असल्याने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्सवामुळे मंदिर परिसरातील दुकाने गजबजून गेले असून फुल, प्रसाद साहित्याने फुलली आहेत. दहा दिवस गर्दीचा महापूर राहणार आहे . आई राजा उदोऽ उदो 55 च्या जय घोषाने तुळजापूर दाणून गेले असून तुळजापुरात रविवारी महाराष्ट्रातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळे आई राजा उदे उदेच्या गजरात वाजत गाजत तुळजाभवानी मंदिरातून भवानी ज्योत प्रज्वलित करून व घटस्थापनेसाठी पुजेचे श्रीफळ घेवून रवाना झाले. तुळजापुरात नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. त्यात कर्नाटक राज्यातील व बंजारा समाजाचा भाविकांची संख्या लक्षणीय होती.
दोन वर्षांनंतर हा शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. याच दरम्यान देवीच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. या काळात काही अघटित घडू नये यासाठी मंदिर प्रशासनाने आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नवरात्रोत्सव निमित्ताने पुढील दहा दिवस आदिशक्तीचा जागर पहायला मिळणार आहे. . या सोहळ्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व नियोजन करण्यात आले असून मंदीर परिसरात सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे.
चंद्रपुरात नवरात्रीचा उत्साह
चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेल्या देवी महाकालीच्या नवरात्र उत्सवाला आज घटस्थापनेने प्रारंभ झाला आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी चांदागडच्या आईचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येत भाविक मंदिरात पहाटे पासून दाखल झाले आहेत. आज सकाळी देवीची विशेष पूजा करून घटस्थापना करण्यात आली. चौदाव्या शतकात गोंड राणी 'हिरातनी' आणि पंधराव्या शतकात राणी 'हिराई' ने बांधलेल्या या मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या पाच राज्यातील भाविक गर्दी करतात. पुढचे नऊ दिवस देवीच्या दर्शनाला हजारो भक्त हजेरी लावणार आहे