राष्ट्रीय महामार्गाच्या संथ कामानं पालखी मार्गाची वाट बिकट, पालखी येण्यापूर्वी काम पूर्ण होणार का?
पालखी सोहळ्यातील प्रमुख ठिकाण असते ते वेळापूर (Velapur). वेळापूरमधील उतारावर सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणारा धावा होत असतो. नेमके याच धाव्याच्या ठिकाणी असणाऱ्या उड्डाण पुलाचे काम रखडले आहे.
Ashadhi Wari Palkhi Marg: आषाढी वारीचा पालखी (Ashadhi Wari Palkhi Marg) सोहळा जवळ येत आहे. त्यापार्श्वभूमीवर पालखी मार्गाचे काम सुरु आहे. मात्र, हे काम संथ गतीनं सुरु अून, ठिकठिकाणी कामे रखडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पालखी सोहळ्यातील प्रमुख ठिकाण असते ते वेळापूर (Velapur). वेळापूरमधील उतारावर सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणारा धावा होत असतो. नेमके याच धाव्याच्या ठिकाणी असणाऱ्या उड्डाण पुलाचे काम रखडले आहे. त्यामुळं आता पालखी येण्यापूर्वी हे काम पूर्ण होणार का? असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.
जागा ताब्यात घेण्यावरुन कामाला झाला विलंब
वेळापूर येथे पालखी सोहळ्यातील मुक्काम असतो. याच ठिकाणी मुख्य चौकात हे उड्डाण पुलाचे काम अतिशय संथ गतीने आता सुरु झाले आहे. गेले अनेक महिने जागा ताब्यात घेण्यावरुन कामाला विलंब होत होता. मात्र जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुढाकार घेत यातील बहुतांश जागेचा प्रश्न मार्गी लावल्याने आता पुन्हा या कामास सुरुवात झाली आहे. अजूनही येथील काही दुकानदारांनी न्यायालयीन लढाई सुरु केल्याने गावातील सर्व्हिस रोड आणि गटारीसाठी आवश्यक जागा ताब्यात घेता आलेली नाही. यात ज्या दुकानदारांची व्यावसायिक जागा गेल्या त्यांना योग्य मोबदला मिळाला नसल्याच्या या दुकानदारांच्या तक्रारी आहेत. त्यामुळं आता यापालखी मार्गात ज्या दुकानदारांच्या व्यावसायिकांच्या जागा गेल्या आहेत, त्यांचा प्रश्न मार्गी लागतो का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 29 जून रोजी आळंदी येथून प्रस्थान होणार
दरम्यान, आता ज्यांनी न्यायालयीन लढाईत सर्व्हिस रोड अडवले आहेत, त्यांचाही तोडगा तातडीने काढावा लागणार आहे. कारण, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 29 जून रोजी आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. 13 जुलै रोजी मुक्कामाला वेळापूर येथे असणार आहे. अशावेळी उरलेल्या महिनाभरात वेळापूर येथील उड्डाण पूल, जोडणारे पालखी मार्ग, सर्व्हिस रोड यांची कामे पूर्ण करायला प्रशासनासमोर केवळ 29 दिवसांचा कालावधी राहिला आहे. यात ही सर्व कामे पूर्ण केल्यावर पालखी सोहळा वेळापुरात पोहोचू शकणार आहे. एकंदर पालखी मार्गाच्या संथ व गहाळ कामामुळं प्रशासनाच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या: