Nashik Trimbakeshwer : तिसऱ्या श्रावण सोमवारी गर्दीचा महापूर, तब्बल एक लाखाहून अधिक भाविकांची मांदियाळी, फेरीलाही गर्दी
Nashik News : तिसऱ्या श्रावणी सोमवार (Shravani Somwar) निमित्त त्र्यंबकेश्वर नगरीत तब्बल एक लाखाहून अधिक भाविकांनी हजेरी लावली.
नाशिक : तिसऱ्या श्रावणी सोमवार (Shravani Somwar) निमित्त त्र्यंबकेश्वर नगरी भाविकांनी गजबजून गेली असून त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) जोतिर्लिंग दर्शनसह भाविकांनी ब्रम्हगिरी फेरीचा आनंदही घेतला आहे. तब्बल एक लाखाहून अधिक भाविकांनी त्र्यंबक नगरीत हजेरी लावली असून त्र्यंबकनगरी फुलून गेल्याचे पाहायला मिळाले. तर ब्रम्हगिरी फेरी मार्गावर बम बम भोलेच्या जयघोषाने भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
नाशिक (Nashik) जवळच्या त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग (Trimbakeshwer Jotirlinga) दर्शनासाठी वर्षभर भाविकांची रीघ लागलेली असते. तर श्रावण महिन्यात देखील भाविकांची गर्दी पाहायला मिळते. त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग दर्शनासाठी पहिल्या श्रावणी सोमवारपासून भाविकांची गर्दी वाढत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला. त्र्यंबकेश्वर दर्शनासह लाखो भाविकांनी ब्रम्हगिरी फेरीची प्रदक्षिणा देखील पूर्ण केली. तिसऱ्या श्रावण सोमवारानिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये जवळपास लाख ते दीड लाख भाविकांची गर्दी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. देशभरातून भाविक त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी येत आहेत. विशेष म्हणजे ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा देखील लाखो भाविक करत असतात. त्यामुळे आजच्या तिसऱ्या सोमवारी त्र्यंबक नगरी भाविकांनी फुलून गेली.
श्रावण (Shravan) महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे तिसऱ्या श्रावण सोमवारला भाविक लाखोंच्या संख्येने दाखल होतात. त्यामुळे त्र्यंबकेश्वरला श्रावण महिन्यात विशेष महत्व असते. या दिवशी ब्रम्हगिरीची प्रदक्षिणाही केली जाते. त्यामुळे श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी भाविकांचा ओघ जास्त असतो. रविवारी सायंकाळपासूनच भाविकांनी प्रदक्षिणेचा रस्ता धरला होता. संपूर्ण रात्रभर ते सोमवार दुपारपर्यंत प्रदक्षिणा मार्ग भाविकांच्या (Bramhgiri Feri) गर्दीने फुलून गेला होता. रविवार सायंकाळपासून ते सोमवारी दुपारपर्यंत भाविक प्रदक्षिणेला जातच होते. जवळपास एक लाख पेक्षा जास्त भाविकांनी प्रदक्षिणा पूर्ण केली. भाविकांची गर्दी पाहता संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर एक मानवी साखळी तयार झाली होती. प्रदक्षिणा मार्गावर विविध सामाजिक संस्थांच्या वतीने फराळाचे पदार्थ, केळी, चहाचे वाटप करण्यात आले. तिर्थराज कुशावर्तावर स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी 3 वाजता पारंपारीक पद्धतीने भगवान त्र्यंबक राजाचा पालखी सोहळा संपन्न झाला .
त्र्यंबकेश्वर हजार पोलिसांचा बंदोबस्त
दरम्यान तिसऱ्या श्रावणी सोमवारी गर्दी लक्षात घेत त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट, त्र्यंबकेश्वर पोलीस, नाशिक जिल्हा प्रशासन, एसटी महामंडळ, त्र्यंबकेश्वर स्थानिक प्रशासन यांच्याकडून नियोजन करण्यात आले होते. एसटी महामंडळाकडून जवळपास 250 बसेसचे नियोजन करण्यात आले होते. तर स्थानिक प्रशासनाकडून आरोग्य सुविधा, पाण्याची व्यवस्था, फिरते शौचालय आदींची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पोलिसांकडून देखील मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यात चार डीवायएसपी, 17 पोलीस अधिकारी, 28 एपीआय, पीएसआय, 450 पोलीस कर्मचारी, 30 ट्राफिक कर्मचारी, 500 होमगार्डचा ताफा त्र्यंबकेश्वरसह ब्रम्हगिरी फेरी मार्ग, पार्किंगची ठिकाणे आदी ठिकाणी तैनात करण्यात आला होता. त्यामुळे तिसरा श्रावणी सोमवार पार पडला आहे.
इतर महत्वाची बातमी :