Mahayuti Seat Sharing : नाशिक, संभाजीनगरची जागा आमचीच, सर्वांनी युती धर्म पाळावा; संजय शिरसाट थेटच बोलले
Lok Sabha Election 2024 : संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची जागा आमचीच आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा सुद्धा आमची असून, हेमंत गोडसे येथून दोन वेळ जिंकून आले आहेत : संजय शिरसाट
Lok Sabha Election 2024 : महायुतीमधील नाशिक (Nashik) आणि छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) जागावाटपाचा तिढा काही सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. अशात शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आज पुन्हा एकदा नाशिक आणि संभाजीनगरची जागा आमचीच असल्याचं म्हणत दावा ठोकला आहे. तसेच कोल्हापूरमधील (Kolhapur) उमेदवार बदलला जाणार नसल्याचे देखील शिरसाट म्हणाले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दरम्यान यावेळी बोलतांना शिरसाट म्हणाले की, “संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची जागा आमचीच आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा सुद्धा आमची असून, हेमंत गोडसे येथून दोन वेळ जिंकून आले आहेत. त्यामुळे त्या जागेवर आमचाच हक्क आहे. कोल्हापूर उमेदवार बदलेल असे आता वाटत नाही, शिवसेनेच्या ज्या जागा आहेत, त्या त्यांच्याच असतील. तसेच, युती धर्म सगळ्यांनी पाळायला हवा, असे म्हणत शिरसाट यांनी भाजपसह राष्ट्रवादीचे कान टोचले.
राणेंच्या नावाची घोषणा झाल्यास युतीधर्म पाळू...
पुढे बोलतांना शिरसाट म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात फॉर्म भरण्यासाठी काही दिवस शिल्लक आहे. महायुतीमध्ये बोलणी पूर्ण झाली आहे. सर्व उमेदवारांची घोषणा एक दोन दिवसात होणार आहे. सगळ्या गोष्टींचे उत्तर आपल्याला उद्या मिळेल. नारायण राणे साहेब उद्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत, याची मला कल्पना नाही. सर्व बाबीचा खुलासा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जाईल. राणे यांच्याबाबत तशी घोषणा झाल्यास युती धर्म आम्ही पाळू असे शिरसाट म्हणाले.
कार्यकर्त्यांनी विचलीत होऊ नये
हिंगोली लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना लढवणार असून, नांदेड लोकसभेची जागा भाजपची आहे. कार्यकर्त्यांनी विचलीत होऊ नये, कार्यकर्त्यांनी असंतोष करू नये, सबुरीने घ्यावे, उमेदवार बदलबाबत निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत असेही शिरसाट म्हणाले.
संजय राऊत यांच्यावर देखील टीका
दरम्यान याचवेळी संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे. “ एकनाथ शिंदे साहेबांचे काय होईल याची चिंता संजय राऊतने करू नये, जिथं खाता त्या पक्षाची चिंता करा, यांची वाकून पाहायची सवय जात नाही, असे शिरसाट म्हणाले. तसेच, उबठा गटाला दरवाजे नाहीत, त्यांच्या कडे कुणी जाणार नाही. ते स्वतः गद्दार आहेत त्यांनी सगळं संपवलं, खरा गद्दार संजय राऊत असल्याचे देखील शिरसाट म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :
मोठी बातमी : गोडसेंपाठोपाठ छगन भुजबळही तडकाफडकी मुंबईला रवाना, नाशिकच्या जागेचा तिढा वाढणार?