नासाला चंद्रावर पाण्यासह दोन जबरदस्त संशोधनं सापडली, पाणी शोधणाऱ्या टीममधील जहीर अलींचा दावा
नासाला नुसते चंद्रावर सूर्यप्रकाश असणाऱ्या भागात पाणीच सापडले नाही, तर यापेक्षा जबरदस्त अजून दोन संशोधने ही हाती आली आहे. ती यापेक्षा ही मोठी आहेत. पण याची माहिती नासा आता नाही तर थोड्या दिवसाने जगाला देणार असा दावा चंद्रावर पाणी शोधणाऱ्या टीममधील जहीर अली यांनी केला आहे.
नागपूर : नासाला नुसते चंद्रावर सूर्यप्रकाश असणाऱ्या भागात पाणीच सापडले नाही, तर यापेक्षा जबरदस्त अजून दोन संशोधने ही हाती आली आहे. ती यापेक्षा ही मोठी आहेत. पण याची माहिती नासा आता नाही तर थोड्या दिवसाने जगाला देणार असा दावा चंद्रावर पाणी शोधणाऱ्या टीममधील जहीर अली यांनी केला आहे.
एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, चंद्रावर पाणी कसं सापडलं आहे ते आधी सांगितलं आहे. नासाचं सोफिया प्रोजेक्ट म्हणजे नासा आणि जर्मन ऐरोस्पेस सेंटरमधील बोइंग 747SP विमानाला खास बदलून त्यात एक स्टेट ऑफ आर्ट टेलिस्कोप लावून त्यातून केलेले निरीक्षण आहे. चंद्रावरचे पाणी रेगिस्तानच्या रेतीतील पाण्यापेक्षा ही कमी आहे. पण नासाच्या सोफियाची दुर्बिण खूप जबरदस्त असल्यामुळे आम्हाला ते पाहायला मिळालं. आता ह्याचा वापर करून चंद्रावर अजून कुठे कुठे पाणी असू शकतं यासाठी मॅपिंग करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले की, एकूण सोफियाचे विमान बनवून, त्या दुर्बिणी त्यात लावून, ते प्रोजेक्ट इथवर आणायला 15 वर्ष लागले, पण पाणी शोधायला फक्त 4 ते 5 तास लागले. खूप आधीच कळले की पाणी सापडले आहे, पण जो पर्यंत डेटा एनेलिसिस पूर्ण होत नाही तोपर्यंत ही बाब जगापुढे आणू शकत नव्हतो. हे सांगायला आम्ही खूप आतुर होतो, पण बोलू शकत नव्हतो, असंही जहीर म्हणाले.
जहीर अली म्हणाले की, माझा जन्म अमेरिकेत झाला पण नागपूर आमचे गाव. आजी आजोबा नागपुरात. मी लग्न करून नागपूरची 'छोकरी उचलून आणली' आहे. नागपूरबाबतच्या आठवणी सांगताना ते म्हणाले की, तिथे नागपुरात सेमिनरी हिल्सवर मी खूप खेळलो आहे. महाराजबाग बघायला नेहमी जायचो, कस्तुरचंद पार्कसमोरचा पोहा तर्री मिस करतो, असंही ते म्हणाले. सोबतच नागपूरचा ऑरेंज ज्युसही. अमेरिकन ऑरेंज खूप चांगलं आहे पण त्याला नागपूर संत्र्याची सर नाही, असंही ते म्हणाले.
जहीर यांनी सांगितलं की, या प्रोजेक्टचे मुख्य वैज्ञानिक ही भारतीय आहेत. यासाठी 200 जणांची टीम आहे ज्यात अनेक भारतीय आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
Water on Moon : चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी सापडलं, नासाचा दावा
चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी सापडल्याचा नासाचा दावा
नुकतंच चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी सापडल्याचा दावा नासाने केला होता. नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेद्वारे आम्ही ते पहिल्यांदाच शोधलं आहे असं नासाने म्हटलं होतं. चंद्राच्या सूर्यप्रकाशीत भागांतही पाणी असल्याचा शोध नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेने लावला आहे. चंद्रावर पाणी सापडणे महत्त्वाचं असल्याचही नासाने म्हटलं आहे. चंद्राच्या फक्त ध्रुवीय आणि अंधाऱ्या प्रदेशापुरते पाण्याचे अस्तित्व मर्यादीत नसून, चंद्राच्या सूर्यप्रकाशीत पृष्ठभागावर सर्वत्र पाण्याचे अंश असल्याची माहिती या शोधातून समोर येत आहे. या शिवाय नासाने दोन अंतराळवीरांनाही 2024 पर्यंत चंद्र मोहिमेवर पाठवण्याचाही निर्णय घेतला आहे. जे दोन अंतराळवीर चंद्रावर जातील त्यापैकी एक पुरुष आणि एक महिला अंतराळवीर असेल आणि त्या दृष्टीने हा शोध अत्यंत महत्त्वाचा असल्याचं नासाने सांगितलं आहे. नासाना म्हटले आहे की, सहारा वाळवंटात जेवढे पाण्याचे अंश असतील त्यापेक्षा 100 पटीने कमी पाण्याचे अंश चंद्रावर असण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत पाण्याचा अंश सापडणे ही शास्त्रज्ञांसाठी आशयकारक गोष्ट आहे.