राज ठाकरेंच्या सभेत नांदेड मनसे जिल्हाध्यक्षाला दहा लाखांचा फटका, 200 ग्रॅम सोनसाखळी लंपास
मॉन्टीसिंग जहागीरदार हे आपल्या अंगावर जवळपास 50 तोळे सोने नेहमी परिधान करतात. पण राज ठाकरे यांच्या सभेच्या दिवशी चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील सोन्यावर डोळा ठेवून आपला उद्देश साधला.
नांदेड : औरंगाबाद इथल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेत नांदेड जिल्ह्यातील मनसे जिल्हाध्यक्षाला तब्बल दहा लाख रुपयांचा फटका बसला आहे. राज ठाकरेंच्या सभेला तुफान गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरटेही या सभेत सक्रिय झाले होते. ज्यात नांदेड जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांच्या 200 ग्रॅम वजनाच्या आणि तब्बल 10 लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या साखळीवर चोरट्यांनी आपला हात साफ केला.
औरंगाबाद इथे 1 मे रोजी आयोजित केलेल्या राज ठाकरेंच्या जाहीर सभेसाठी मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात मनसैनिक दाखल झाले होते. राज ठाकरेंच्या या सभेत विक्रमी गर्दी झाली होती. ज्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार हे देखील हजर होते. नांदेड जिल्ह्यातील गोल्डमॅन म्हणून मॉन्टीसिंह जहागीरदार यांची ओळख आहे. मॉन्टीसिंग जहागीरदार हे आपल्या अंगावर जवळपास 50 तोळे सोने नेहमी परिधान करतात. पण राज ठाकरे यांच्या सभेच्या दिवशी चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील सोन्यावर डोळा ठेवून आपला उद्देश साधला. त्यांची दहा लाख किंमतीची आणि 200 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लंपास केली.
कोण आहेत मॉन्टीसिंह जहागीरदार
मॉन्टीसिंग जहागीरदार हे मूळचे नांदेड येथील गरुद्वारा चौरास्ता येथील रहिवासी आहेत.तर त्याच ठिकाणी त्यांचे संतकृपा हे व्यापारी संकुल आहे. जहागीरदार हे शेतकरी सुपुत्र असून ते तीन भाऊ आहेत. मॉन्टीसिंग जहागीरदार यांचे नांदेड शहरात विविध व्यापारी संकुल, प्लॉटिंग बिझनेस, फायनान्स कंपनी, हॉटेल्स असा त्यांचा व्यवसाय आहे. तर बीएएलएलबी असे वकिलीचे शिक्षण घेतलेले जहागीरदार हे गेल्या 16 वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काम करतात. तर मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे याठिकाणी राज ठाकरे यांनी केलेल्या विविध आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. वयाच्या 12 व्या वर्षापासून मॉन्टी यांना अंगावर सोने परिधान करण्याची प्रचंड आवड आहे. ज्यात ते गेल्या 20 ते 22 वर्षापासून 70 ते 80 तोळे एवढे भरगच्च सोन्याचे आभूषणे अंगावर परिधान करतात. त्यामुळे त्यांना नांदेडचा गोल्डनमॅन म्हणून जिल्हाभरात ओळख आहे. या गोल्डनमॅनच्या अंगावरील दागिने पाहून कोणीही सहज आवाक होईल. मॉन्टी यांना गळ्यातील दागिने जसे की चैन, लॉकेट, सोन्याची मूर्ती, हे प्रामुख्याने घालण्याची आवड आहे. सोबतच पाच ते दहा बोटात अंगठी, ब्रेसलेट हेही आभूषणे ते नेहमी परिधान करतात. त्यामुळे त्यांना पाहताच गोल्डनमॅन आल्याचा भास होतो. बलदंड शरीर, जाडजूड मिशा, दाढी, डोक्यावर भरदार पगडी, अंगावर, हातात, गळ्यात असणारे सोने पाहून कुणाचीही भंबेरी उडणार नाही तर नवलच, पण असा अवतार असताना सुद्धा औरंगाबाद येथे या गोल्डनमॅनला चोरट्यांनी दहा लाख किंमतीची 200 ग्रामच्या साखळीची चोरी केली.
औरंगाबादमधील सभेत राज ठाकरे काय म्हणाले होते?
औरंगाबादेत मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात महाराष्ट्र दिनी पार पडलेल्या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा लावून धरला. लाऊडस्पीकर मशिदींवर लावून तुम्ही गोंगाट करणार असाल, तर त्या मशिदींच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा पठण करु, मोठ्याने वाचू, असं ते पुन्हा एकदा म्हणाले. सोबतच 4 तारखेनंतर जिथे जिथे लाऊडस्पीकरवरुन अजाण होणार, तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले. "माझी शासनाला विनंती आहे, आज तारीख एक आहे. उद्या तारीख दोन आहे. तीन तारखेला ईद आहे. त्यांच्या सणात मला मध्ये यायचं नाही, मात्र 4 तारखेपासून ऐकणार नाही," असा इशारा राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला होता.
मनसेचं भोंग्यांविरुद्ध आंदोलन
राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर कालपासून म्हणजेच 4 मे पासून मनसेचं भोंग्यांविरुद्धचं आंदोलन सुरु झालं. परंतु पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली. पण भोंगे उतरणार तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं.