एक्स्प्लोर
नाणार प्रकल्प लादणार नाही : मुख्यमंत्री
गुजरात आणि आंध्रप्रदेशाने ही रिफायनरी त्यांच्याकडे व्हावी अशी मागणी केली होती. पण प्रकल्प महाराष्ट्राला मिळाला आहे.
नागपूर : नागपुरातील पावसाळी अधिवेशनात नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पावरुन विरोधकांसह सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने रान उठवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदन दिलं. विरोध होत असेल तर नाणार प्रकल्प लादणार नाही, अशी सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
नाणार प्रकल्पावर प्रेझेन्टेशन देणार
"समृद्धी महामार्गालाही असाच विरोध झाला, पण आम्ही चर्चेने प्रश्न सोडवला. आता 93 टक्के जमीन अधिग्रहित झाली आहे. नाणार प्रकल्पाबाबत विविध पक्षांसोबत चर्चा करण्याची तसंच नागरिकांना समजावण्याची आमची तयारी आहे. सर्व बाबी पटवल्यानंतरच आम्ही पुढे जाणार आहोत. सगळ्यांच्या शंकांचं निरसन करु. मी नाणार प्रेझेन्टेशन देणार आहे. पण नाणार प्रकल्प कोणावरही लादणार नाही," असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रात रिफायनरी
"पर्यावरणाच्या बाबतीत सिंगापूर जगातील सर्वात सजग देश आहे. त्यांनीही कोस्टल रिफायनरीला परवानगी दिली. त्याच धर्तीवर ही रिफायनरी तयार करण्याचा सरकाराने विचार केला. त्यानुसार जागा शोधली, समितीने सर्व्हे करुन कामाला सुरुवात केली. मात्र त्यानंतर नव्याने विरोध सुरु झाला. एकीकडे आंदोलन सुरु झालं आणि दुसरीकडे जमीन अधिग्रहणाला परवानग्या दिल्या," असंही देवेंद्र फडणवीस स्पष्ट केलं.
नाणार रिफायनरीतून सर्वात मोठी गुंतवणूक
गुजरातच्या जामनगरमध्ये रिफायनरी आहे. यामुळे गुजरातच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्पाचं समर्थन केलं. मुख्यमंत्री म्हणाले की, "पश्चिमी पट्ट्यात रिफायनरी करायची आहे. गुजरात आणि आंध्रप्रदेशाने ही रिफायनरी त्यांच्याकडे व्हावी अशी मागणी केली होती. पण प्रकल्प महाराष्ट्राला मिळाला आहे. आपल्याकडे तीन लाख कोटींची गुंतवणूक आहे. नाणार ही ग्रीन रिफायनरी आहे, जी आपल्या राज्यासाठी सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे. म्हणून राज्य सरकारने नाणारजवळच्या जमिनीचं अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला आहे."
नाणारच्या मुद्द्यावर सरकार अल्पमतात : पृथ्वीराज चव्हाण
"हा प्रकल्प कसा हिताचा आहे, हे मुख्यमंत्र्यांनी पटवून द्यावं," असं आव्हान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. "सौदी अरेबियामधले लोक कोकणात कामाला येणार. त्यांच्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात येईल. नाणार प्रकल्प लादला आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. नाणारच्या मुद्द्यावर सरकार अल्पमतात आहे," असं चव्हाण म्हणाले.
रिफायनरीमुळे कोकणातील निसर्गाचा ऱ्हास होईल : सुनील प्रभू
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प असताना जवळच रिफायनरी नको, यामुळे कोकणातील निसर्गाचा ऱ्हास होईल, असं मत शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी नोंदवलं. "12 ते 13 लाख आंबे, औषधी वनस्पती, मासेमारी, शेतीचं नुकसान होईल असं गाडगीळ समितीच्या अहवालात म्हटलं आहे. यामुळे स्थानिकांचा विरोध आहे. म्हणून नाणार प्रकल्प रद्द करा, अशी शिवसेनची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की कोकणी जनतेची भावना, तज्ञांची मतं लक्षात घेऊन शंका दूर करा," असंही सुनील प्रभू म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement