Nagpur : सिनेट निवडणुकीत प्रचाराला वेग; महाविद्यालयांसह घरोघरी जाऊन संपर्क साधण्यावर भर
निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत प्रशांत डेकाटे आणि निवडणूक लढविणाऱ्या अन्य दोघांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. न्यायमूर्तींनी नोटीस बजावून प्रतिवादींना 21 नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.
Nagpur News : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (RTMNU) वर्तुळात सिनेट निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. निवडणूक रिंगणात उतरलेल्या सर्व संघटनांनी विजयासाठी पूर्ण जोर लावल्याचे दिसून येत आहे. महाविद्यालयांमध्ये शिक्षकांच्या भेटी घेण्याबरोबरच मतदारांच्या घरी जाऊन संपर्क साधण्याचे अभियानही सुरू असल्याचे दिसते. पदवीधर गटातील उमेदवार प्रचारासाठी सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करीत आहेत.
शिक्षक गटातील 10 जागांवर चुरशीच्या लढतीचे चित्र आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ज्येष्ठ प्राध्यापकांच्या पत्नी आणि काही अधिकाऱ्यांच्या मुलंही निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत. नियमानुसार अधिकारी महाविद्यालयात जाऊन प्रचार करू शकत नाहीत. त्यामुळेच ते घरोघरी जाऊन प्राध्यापकांशी संपर्क साधत आहेत. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकाही जानेवारीत होणार आहेत. सीनेट निवडणुकीत मतदान करणारे प्राध्यापकच त्यावेळीही मदतार असतील. या पार्श्वभूमीवर सीनेट निवडणुकांकडे रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची तयारी म्हणूनही सर्वच संघटनांनी जोर लावला आहे. त्याचा एकूणच परिणाम म्हणून प्रचार जोरावर असून वातावरण चांगलेच तापलले दिसून येत आहे.
पदवी गटातील उमेदवारांही प्रचारात कमी पडणार नाही याची खबरदारी घेत आहेत. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यावर मर्यादा असल्याने सोशल मीडियाचा जोरदार वापर करीत आपले विचार व अजेंडा अधिकाधिक व्हायरल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदार यादीतील नावाच्या आधारेही संपर्क मोहीम तीव्र करण्यात आली आहे. यावेळी पदवीधर वर्गातील मतदारांची संख्या वाढली आहे. बहुतांश उमेदवार दुसऱ्या- तिसऱ्या टर्मसाठी आपले नशीब आजमावत आहेत, तर काही संघटनांनी शिक्षक संवर्गातील नवीन उमेदवारांनाही संधी दिली आहे.
पहिल्या टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान
पहिल्या टप्प्यात होणाऱ्या शिक्षक संवर्गातील जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याची मतमोजणी 22 नोव्हेंबरला होणार आहे. दुसरीकडे, 30 नोव्हेंबर रोजी पदवीधर वर्गासाठी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी 4 जिल्ह्यांमध्ये एकूण 95 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्याची मतमोजणी 2 डिसेंबरला होणार आहे. विद्यापीठ प्रशासनाकडूनही जोरात तयारी सुरू आहे.
न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत प्रशांत डेकाटे आणि सिनेट निवडणूक लढविणाऱ्या अन्य दोन सदस्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोमवारी याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायमूर्तींनी कुलगुरू, कुलसचिव आणि इतरांना नोटीस बजावून 21 नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळेच पदवीधर जागेसाठी येत्या 30 नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
ही बातमी देखील वाचा